अजित पवारांनी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली

'लाडू घशाखाली उतरले नाहीत, उतरणारही नाहीत'

Updated: Nov 24, 2019, 10:45 AM IST
अजित पवारांनी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली title=
संजय राऊत

मुंबई : शनिवारी सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा फेरबदल झाला आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, अजित पवार यांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली. या सर्व प्रकारावर आपली प्रतिक्रिया देत शिवसेनेच्या संजय राऊत यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेत जळजळीत टीका केली. अजित पवारांनी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली असं म्हणत त्यांच्याविरोधातही राऊतांनी नाराजीचा सूर आळवला. 

'राज्याचे मुख्यमंत्री शपथ ग्रहण करतात आणि राज्यातील जनतेला याची साधी कल्पनाही नाही. सकाळी जेव्हा जाग येते, तेव्हा हा सारा प्रकार समोर येतो', असं म्हणत हा प्रकार खेदजनक असल्याचं राऊत म्हणाले. चुकीच्या मार्गाने सत्ता स्थापत या सच्चेचे लाडू खाल्ले खरे पण, हे लाडू घशाखाली उतरले नाहीत आणि उतरणारही नाही असं म्हणत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर राऊत बरसले. लोकशाहीचा अनादर करणाऱ्यांनी किमान लोकशाहीचं नाव घेऊ नका असं सूचक विधान त्यांनी यावेळी केलं. 

शनिवारी पहाटे पाच वाजता आदेश येतो काय, राष्ट्रपती राजवट हटते काय आणि हा सारा प्रकार घ़डतो काय, असं म्हणत त्यांची हा एक काळा दिवस असल्याचं स्पष्ट केलं. सध्या राजकीय पटलावर सुरु असणाऱ्या जोरदार घडामोडी, सत्तापालट आणि ही सारी गणितं पाहता आमच्या महाविकास आघाडीकडे बहुमत आहे त्यामुळे  पुढच्या दहाव्या मिनिटाला बोलवलं तरीही बहुमताच्या परेडसाठी राज्यपालांसमोर हजर राहू या शब्दांत त्यांनी फसवणूक करणाऱ्यांना आव्हान दिलं. 

आम्ही तोडफोडीच्या मार्गाने सरकार स्थापन करणार नाही, असं म्हणत शिवसेना आणि मित्र पक्षांची पुढील भूमिका काय असेल, यावरुन पडदा उचलला. या साऱ्या प्रकारात शरद पवारांचं नाव चुकीच्या पद्धतीने उचललं जात असल्याचं पाहून, हा भाजपचा डाव असल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. खोटं बोलण्यात भाजपचा हात कोणीही पकडू शकत नाही या शब्दांत भाजपच्या भूमिकेला खेट आव्हान देत धमक्यांच्या चर्चांवरही त्यांनी प्रकाश टाकला. 'संजय राऊत घाबरणाऱ्यांपैकी नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही तुम्हाला घाबरवून पळवून लावू. कारण, स्वत:च्याच पेचात भाजप अडकली आहे. अजित पवारांनी त्यांच्या आमदारांना फसवलं, आता त्यांना भाजप फसवणार', असं म्हणत राऊतांनी शिवसेनेच्याच शैलीत झाल्या प्रकारावर तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली.