...तर मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत बसणारा 'तो' शिवसैनिक कोण असेल?

'उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणं ही महाराष्ट्राची गरज'

Updated: Nov 10, 2019, 05:37 PM IST
...तर मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत बसणारा 'तो' शिवसैनिक कोण असेल?

मुंबई : 'आत्तापर्यंत आपण पालखीचे भोई होतो. परंतु, यापुढे आपण पालखीचे भोई होणार नाही... तर आता मी त्याच पालखीत शिवसैनिकाला बसवल्याशिवाय राहणार नाही' असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटल्यानंतर आणखीन एका चर्चेला तोंड फुटलंय. उद्धव ठाकरेंच्या मनातला 'मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत बसणारा तो शिवसैनिक कोण असेल?' याची उत्सुकता अनेकांना लागलीय. यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, निवडणुकीत उभं राहून निवडून येणारा पहिले ठाकरे अर्थात आदित्य ठाकरे, शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते संजय राऊत की शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हा 'शिवसैनिक' असतील? अशी चर्चा आता सुरू झालीय. 

एकीकडे 'उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणं ही महाराष्ट्राची गरज' असल्याची पोस्टरबाजी शिवसैनिकांनी केलीय. तर याआधी, आदित्य ठाकरेंनाच मुख्यमंत्री बनवा, अशा आशयाची पोस्टरबाजीही मुंबईत पाहायला मिळाली होती.

दुसरीकडे, संजय राऊत यांनी जवळपास दररोज पत्रकार परिषद घेत शिवसेनेची बाजू प्रसिद्धी माध्यमांसमोर लावून धरलीय. अतिशय तिखटपणे भाजपाला प्रत्यूत्तर देताना ते अनेकदा दिसत आहेत. यामुळेच, ते भाजपा नेत्यांच्या निशाण्यावर आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनीही अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांना आपल्या भाषणात लक्ष्य केलेलं दिसलं.

तसंच एकनाथ शिंदे हे पक्षातील ज्येष्ठ नेते असून शिवसेना सत्तेत आलीच तर त्यांनाही महत्त्वाचं पद मिळू शकतं अशी चर्चा आहे.

आज झालेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत आक्रमक होत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका मांडली. यावेळी, शिवसेनाच सरकार बनवणार असल्याचा विश्वास त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवला. मढमधल्या 'द रिट्रीट' हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांची ही बैठक पार पडली. भाजपाकडून आमदारांची फोडाफोड होण्याची शक्यता असल्यानं शिवसेना आमदारांना मढमध्ये ठेवण्यात आलंय. उल्लेखनीय म्हणजे, उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत हॉटेलमध्ये दाखल झाले होते.  

दरम्यान, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांबरोबरच केंद्र पातळीवरील नेतेही आग्रही आहेत. यासाठी समोर येणारा दुसरा पर्याय स्वीकारण्यास हे नेते सकारात्मक आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी जवळीक असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. राज्यातील बहुतांश काँग्रेसचे आमदारही शिवसेनेबरोबर जाण्यास तयार आहेत. आता केवळ सोनिया गांधींच्या होकाराची प्रतिक्षा आहे. तर दुसरीकडे शिवसेनेची भूमिकाही काँग्रेसबरोबर जाण्याबाबत सकारात्मक असल्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादीची भूमिका तर याबाबत सकारात्मक आहे. भाजपाने सरकार स्थापन केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा विरोधात मतदान करेल असं मलिक यांनी स्पष्ट केलंय.