धक्कादायक! तीन मुलांची हत्या करत पित्याची आत्महत्या

....म्हणून उचललं हे पाऊल   

Updated: Jun 28, 2020, 08:00 AM IST
धक्कादायक! तीन मुलांची हत्या करत पित्याची आत्महत्या  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : शनिवारी रात्री नालासोपारा भागात एक धक्कादायक घटना घडल्याचं वृत्त समोर येत आहे. नालासोपारा येथे असणाऱ्या डॉननेल परिसरात एका पित्यानं त्याच्या तीन मुलांची गळा चिरुन हत्या करत त्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. 

पोलिसांकडून हाती आलेल्या माहितीनुसार पिता कैलास परमार (४०) यांनी सर्वप्रथम नयन परमार (१०), नंदनी परमार (८) आणि नयना परमार (५) अशा आपल्या तीन मुलांची धारदार शस्त्रानं हत्या केली. ज्यानंतर त्यानं आत्महत्या करण्याचं पाऊल उचललं. 

सध्याच्या घडीला हत्या आणि आत्महत्याप्रकरणी नेमकं कारण काय याचाच पोलिसांकडून तपास सुरु आहे. पण, प्राथमिक स्वरुपात हाती आलेल्या माहितीमुळं धक्का बसत आहे. 

सदर प्रकरणाची तक्रार दाखल करणाऱ्या बीजू मेहता (कैलास यांचे पिता) यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक चणचण आणि पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयामुळं परमार यांनी मुलांची हत्या करत स्वत:चंही आयुष्य संपवण्याचं पाऊल उचललं. 

बीजू परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार कैलास परमार यांची पत्नी जवळपास दीड महिन्यापूर्वीच त्यांना सोडून माहेरी गेली होती. जेव्हापासून कैलास हे त्यांच्या तीन मुलांसमवेत राहत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावर आपल्या पत्नीचा फोटो कोणा एका दुसऱ्या व्यक्तीसमवेत पाहिला. ज्यानंतरच ते आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचल्याचं म्हटलं जात आहे. 

 

शेजाऱ्यांच्या माहितीनुसार कैलास यांच्या हाती कोणताही रोजगार नव्हता. त्यांची पत्नीच मुलांचं पालनपोषण करुन कुटुंब सांभाळत होती. पण, लॉकडाऊनमुळं त्यांच्या पत्नीच्या हातचा रोजगारही गेला होता. बरेच दिवस ती कुटुंब आणि मुलांपासून दूर राहत होती. एकंदर परिस्थिती पाहता आणि घटनांची साखळी जोडता आता तपास यंत्रणा या प्रकरणीच्या निष्कर्षापाशी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.