तर आम्हीही दुसरी बाजू सांगू - पूनम महाजन यांचा इशारा

भविष्यात मुद्दाम आपल्या लोकांना त्रास दिला तर त्याला प्रत्युत्तर द्यावे लागेल. मुंबईचा महापौर हा भाजपचाच असेल असा दावा पूनम महाजन यांनी केला.

Updated: Jan 31, 2022, 03:55 PM IST
तर आम्हीही दुसरी बाजू सांगू - पूनम महाजन यांचा इशारा title=

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युतीत शिवसेना सडली असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक जुने व्यंगचित्र ट्विट केले होते. त्याला भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी उत्तर दिल्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले होते. त्यानंतर आता पूनम महाजन यांनी पहिल्यांदाच शिवसेनेवर टीका केली आहे.

वारंवार ट्विटरवरून भांडी घासल्यासारखं भांडत राहायचं असं मला बिलकुल आवडत नाही. शिवसेनेचे संजय राऊत यांनी एक जुने व्यंगचित्र ट्विट केले होते. त्यावर नामर्द नेमकं कोण असं म्हटल्यावर त्यांनी स्वतःचेच ते ट्विट डिलिट केले. एक वेळ आत्मसन्मान ठीक आहे पण अहंकार नको. काहींच्या डोक्यात अहंकार भरलाय, असे महाजन म्हणाल्या.

आज भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत त्या बोलत होत्या. ठाकरे परिवारातील लोक युतीबाबत भाष्य करत आहे. युतीत शिवसेना सडली असं म्हणतात. पण, नाण्याला दोन बाजू असतात. त्यामुळे नाण्याची दुसरी बाजूचे सत्य महाजन परिवार समोर मांडेल हे त्यांनी लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना पश्चिम बंगालमध्ये जे झाले तसेच मुंबईत करेल. त्याचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्रास सहन करावा लागेल. आपल्याला ते भेटतील तर आपल्यालाही त्यांना उत्तर द्यावं लागेल. भविष्यात मुद्दाम आपल्या लोकांना त्रास दिला तर त्याला प्रत्युत्तर द्यावे लागेल. मुंबईचा महापौर हा भाजपचाच असेल असा दावा देखील पूनम महाजन यांनी केला.