मुंबई : एका जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करणे कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव नरसय्या आडम यांना चांगलेच भोवले आहे. जानेवारी महिन्यात सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात आडम यांनी मोदींचे कौतुक केलं होतं. असंघटित कामगारांना घरं देण्याच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या ३० हजार असंघटीत कामगारांच्या घरांचा शिलान्यासही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला होता, त्यावेळी आडम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्तुतिसुमनं उधळली होती. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर कारवाई करीत केंद्रीय कमिटीतून निलंबित केले आहे.
मोदींची अशी स्तुती करणे हे कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे असल्याने आडम यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार, आडम यांना पुढील तीन महिन्यांसाठी केंद्रीय कमिटीतून निलंबित करण्यात आले आहे.