शिवसेनेत फूट, भाऊबंदकीला ऊत, शिंदे आणि उद्धव गटात दुभंगली कुटुंबं

भावंड आणि नवरा-बायकोत गटातटाचं राजकारण, फुटीचं पेव राजकारण्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहचलंय

Updated: Jul 29, 2022, 07:30 PM IST
शिवसेनेत फूट, भाऊबंदकीला ऊत, शिंदे आणि उद्धव गटात दुभंगली कुटुंबं   title=

Maharashtra Politics : शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कुणाची यासाठी आता संघर्ष सुरू झालाय.  त्यातूनच शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अशा दोन गटांमध्ये जोरदार चुरस सुरूंय. आता या फुटीचं पेव राजकारण्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहचलंय. एक भाऊ शिंदे गटात तर दुसरा भाऊ ठाकरे गटात असं चित्र राज्यात दिसतंय. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील गणेश पराडके आणि विजय पराडकेही याला अपवाद राहिलेले नाहीत. 

दोन सख्खे भाऊ दोन गटात
नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य आणि जिल्हाप्रमुख गणेश पराडके यांनी उद्धव ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतलाय तर त्यांचे मोठे बंधू विजय पराडकेंनी मात्र शिंदे गटाला साथ दिलीय. शिवसेना फुटीनंतर बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे शिंदेंच्या तंबूत दाखल झाले. मात्र दुसरीकडे त्यांचे भाऊ संजय जाधव यांनी मात्र भावाची साथ सोडून ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेतलाय. 

प्रतापराव जाधव यांनी उपनराध्यक्षपद देताना संजय जाधव यांना डावलल्यानं त्यांनी मूळ शिवसेनेतच राहणं पसंत केल्याचं बोललं जातंय. भावा-भावांमध्ये असा संघर्ष सुरू असताना त्यात बहिणी भाऊही मागे नाहीत. जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी बंडखोरी करत शिंदे गटात सामील झाले. तर दुसरीकडे त्यांची चुलत बहिण वैशाली सूर्यवंशी यांनी मात्र उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ असल्याचं सांगितलंय. भावा-बहिणीतली फूट कमी होतीय म्हणून की काय, यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांनीही उद्धव ठाकरे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. 

भाऊबंदकी, कुटुंबातला वाद तसा राज्यासाठी नवीन नाही. त्यामुळे शिंदे-ठाकरे फुटीचे पडसाद तळागाळापर्यंत उमटणं स्वाभाविक आहे. अर्थात हा कुटुंबातला वाद राजकारणापुरताच मर्यादित राहावा हीच अपेक्षा.