मुंबई : राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Workers Strike) राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ही पगारवाढ एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या पत्रकार परिषेदत एसटी संपकरी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतही उपस्थित होते.
राज्य सरकारने पगारवाढीचा निर्णय घेतला असला तरी, एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्दायवर ठाम आहेत. राज्य सरकारचा पगारवाढीचा निर्णय मान्य नसल्याचं एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. आता जिंकू किंवा मरु पण मागे हटणार नाही असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
आम्ही शेवटपर्यंत थांबू, कोणात किती दम आहे ते बघू, तुम्ही आम्हाला गोळ्या घालू शकत नाही, सरकारची ही मूजोरी चालणार नाही, असा इशारा देत कर्मचाऱ्यांचा अश्रुचा बांध फुटला.
आमची मागणी एकच आहे ती म्हणजे विलीनीकरणाची. गरीब कर्मचाऱ्यांवर अत्याचार होत असतानाही सरकार डोळे झकून बसलं आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने न्याय मागतो आहे, आमची एकच विनंती आहे, कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रु आणू देऊ नका, सकारच्या हलगर्जीपणामुळे कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत असा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.
परिवहन मंत्री, मुख्यमंत्री आणि जाणत्या राजा असणाऱ्या शरद पवारांनी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रु पाहावेत, फसवी पगारवाढ देऊन तुम्ही हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही ते होऊ देणार ऩाही. एकही कर्मचारी कामावर जाणार नाही. जीव गेला तरी आम्ही मागे हटणार नाही. जीवनवाहीनी मानल्या जाणाऱ्या एसटीसाठी ज्यांनी जीवन व्यतित केलं त्यांच्यावर जीव देण्याची वेळ आली आहे, असा आक्रोश एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.
राज्य सरकारने घोषणा केलेली पगारवाढ आमच्या हक्काची आहे, आमचा 2016 ते 2020 आणि 2020 ते 2024 असे दोन्ही करार प्रलंबित आहेत. त्यामुळे पगारवाढ तर आम्हाला मिळायलाच हवी, पण आमची विलीनीकरणाची प्रमुख मागणी आहे आणि आम्ही त्या मागणीवर ठाम आहोत. असं एसटी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.