शेअर बाजारात मोठी उसळी! ऐतिहासिक कामगिरीसहीत निफ्टी सर्वोच्च स्तरावर; गुंतवणूकदारांची चांदी

Share Market Updates Record: मागील 3 दिवसांपासून शेअर बाजारामधील वाढ संथ गतीने सुरु असतानाच अचानक आज शेअर बाजाराने उसळी घेतल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजाराने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 23, 2024, 01:45 PM IST
शेअर बाजारात मोठी उसळी! ऐतिहासिक कामगिरीसहीत निफ्टी सर्वोच्च स्तरावर; गुंतवणूकदारांची चांदी title=
शेअर बाजाराने घेतली उसळी

Share Market Updates Record: लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या दोन टप्प्यातील मतदान शिल्लक असतानाच शेअर बाजाराने ऐतिसाहिक उसळी घेतली आहे. गुरुवारी म्हणजेच 23 मे 2024 रोजी बाजारात भरभराट पाहायला मिळाली. निफ्टीने आज ऐतिहासिक कामगिरी करताना सर्वकालीन सर्वोच्च स्थानावर झेप घेतली. इंट्राडे व्यवहारांमध्ये निफ्टीने 22,806.20 चा स्तर गाठला. 

तीन दिवसांच्या मंदीनंतर तेजी

मागील 3 दिवसांपासून शेअर बाजारातील वाढ मंदावलेली दिसून आली. मात्र गुरुवारी शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली. संथ सुरुवातीनंतर अचानक बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीमध्ये मोठी वाढ दिसून आली. बीएसईच्या 30 शेअर्सचा सेन्सेक्स बुधवारी 74,221 वर बंद झाला होता. गुरुवारी तो 74,253 वर सुरु झाला. त्यानंतर अचानक शेअर बाजारामध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आणि सकाळी 11.30 च्या सुमारास शेअर बाजाराने तब्बल 444.23 अंकांची उसळी घेतली. 74,665.29 च्या स्तरापर्यंत शेअर बाजाराने उसळी घेतली.

ऐतिहासिक कामगिरी

एनएसईचा निफ्टी हा इंडेक्स 22,614 वर सुरु झाला. त्यानंतर काही वेळातच त्याने 22,800 चा टप्पाही ओलांडला. बुधवारी निफ्टी 22,597.80 वर बंद झाला होता. सेन्सेक्सबद्दल सांगायचं झालं तर आज दिवसभरात सेन्सेक्स थेट 74,991.08 पर्यंत पोहोचला. बीएसईच्या टॉप 30 शेअर्सपैकी 27 शेअर्स सकारात्मक असून केवळ 3 शेअर्समध्ये घसरण दिसत आहे. अॅक्सेस बँकेच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली.

सर्वाधिक तेजी कोणत्या शेअर्समध्ये?

निफ्टी 50 मध्ये सर्वाधिक 5 टक्के वेग हा अदानी इंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये दिसली. त्यानंतर अॅक्सेस बँक आणि एल अॅण्ड टीच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांची वाढ दिसून आली. दुसरीकडे मिडकॅप सेगमेंटमध्ये रेल्वेच्या स्टॉक्स तेजीत राहिले. आरव्ही एनएलच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांची वाढ दिसून आली तर आयआरएफसीच्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. या तेजीला गुंतवणूकदारांना फायदा होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

निफ्टीतील अनेक शेअर्स वर्षभरातील सर्वोच्च स्थानी

एनएसईच्या लिस्टेड 2,572 शेअर्समधून व्यवहार सुरु असून त्यापैकी 1,220 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर 1,242 शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली. 110 शेअर्स जैसे थे आहेत. 101 शेअर्स मागील वर्षभरातील सर्वोच्च स्तरावर आहेत. तर 17 शेअर्स वर्षभरातील सर्वात कमी स्तरावर आहेत. 79 शेअर्सला सर्किट लागलं आहे तर 56 शेअर्समध्ये पडझड नोंदवण्यात आली आहे.

(Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती स्टॉक्सच्या उपलब्ध आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.)