मुंबई: हिंमत असेल तर राज्यात पुन्हा निवडणुका घ्या, असे आव्हान देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी सणसणीत प्रत्युत्तर दिले. नुसत्या राज्यातच कशाला?, संपूर्ण देशात निवडणूक घ्या, असे पवार यांनी म्हटले.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपमध्ये हिंमत असेल सरकार पाडून दाखवावे, असे वक्तव्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा. भाजप महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांना पुरून उरेल, असे म्हटले होते.
उद्धव ठाकरे यांचे भाजपला खुले आव्हान, सरकार पाडून दाखवाच!
या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी मुंबईतील पत्रकारपरिषदेत भाजपला प्रतिआव्हान दिले. मध्यावधी निवडणुकांसाठी आम्ही तयारी करत आहोत. लवकरच महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील असे भाजपाकडून सांगितले जात आहे, याबद्दल तुमचे काय मत आहे?, असा प्रश्न पत्रकारांनी पवारांना विचारला. त्यावर पवारांनी फक्त महाराष्ट्रातच कशाला? लोकसभेचीही निवडणूक घ्या. होऊन जाऊ द्या, असे म्हटले.
हिेंमत असेल तर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा; फडणवीसांचे आव्हान
तसेच राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे. राज्याच्या भल्यासाठी जे शक्य आहे ते करत राहणे हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विचार आहे. सगळ्याच विषयांवर सगळ्यांची मते जुळतील असे नाही. मात्र, एकूण व्यवस्थित चालले आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.