कोरोनाची अफवा दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून चिकन फेस्टिव्हलचे आयोजन

अनेकांनी स्वयंरोजगाराकडे वळत पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, कोरोनाच्या अफवेने पोल्ट्री व्यवसाय पूर्णपणे धोक्यात आला आहे. 

Updated: Mar 9, 2020, 02:59 PM IST
कोरोनाची अफवा दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून चिकन फेस्टिव्हलचे आयोजन

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होते हा लोकांमध्ये पसरलेला गैरसमज दूर करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागातर्फे लवकरच चिकन फेस्टिव्हलचं आयोजन केले जाणार आहे. नागपूर आणि मुंबईत चिकन फेस्टिव्हल भरवला जाणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी जाहीर केले.

चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होत नाही हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. मात्र, तरीही चिकन खाल्ल्याने कोरोना या जीवघेण्या रोगाची लागण होते, अशी अफवा राज्यात जोरदार पसरली आहे. त्यामुळे लोकांनी चिकन खाणे कमी अथवा बंद केले आहे. याचा परिणाम राज्यातील पोल्ट्री उद्योगावर झाला आहे. अनेकांनी स्वयंरोजगाराकडे वळत पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, कोरोनाच्या अफवेने पोल्ट्री व्यवसाय पूर्णपणे धोक्यात आला आहे. 

१०० वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात

सोशल मिडीयावर ही अफवा कुणी पसरवली याचा शोध घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली होती. त्यातून आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून ही अफवा पसरवल्याचे समोर आले आहे. याबाबत लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे सुनील केदार यांनी म्हटले आहे. चिकनमधून कोरोना होतो हा लोकांमध्ये पसरलेला गैरसमज दूर करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागातर्फे जनजागृती केली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारनेही सहकार्य करावे, अशी अपेक्षाही सुनील केदार यांनी व्यक्त केली आहे.