मराठी माणसाला लुटायचे धंदे... देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊत यांना टोला

कितीही दबावाची राजनिती केली तरी भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणं किरीट सोमय्या बंद करणार नाहीत  

Updated: Apr 6, 2022, 11:39 AM IST
मराठी माणसाला लुटायचे धंदे... देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊत यांना टोला title=

मुंबई : ईडी (ED) कारवाईनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ईडीच्या कारवाईतून पर्दाफाश झालेला आहे की मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचं आणि मराठी माणसालाच लुटायचं हा धंदा या मुंबईत कोण करतंय हे आता स्पष्ट झालं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न असून लोकांचं लक्ष्य वेधून घेण्याकरता हे या सर्व गोष्टी बोलल्या जात आहेत, खरं म्हणजे आमच्या अनेक नेत्यांच्या घरात घूसून त्यांची मापं घेऊन नसलेल्या नोटीशी देण्याचं काम झालं, तरीही आम्ही कायद्याने त्याचा मुकाबला करु अशी भूमिका घेतली. पण या लोकांना पुराव्याच्या आधारावर नोटीसा मिळालेल्या आहेत. त्याचं कायद्याने त्याचं उत्तर दिलं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भावनात्मक उत्तर देऊन लोकांचा त्यावर विश्वास बसणार नाही. पत्रावाला चाळ (Patrawala Chawl Scam) ही गरीब मराठी माणसाचा प्रश्न होता, जो अनेक वर्ष भिजत पडला. ज्यांनी या लोकांचे मसिहा म्हणून आपल्याला घोषित केलं होतं, त्याच लोकांनी ही जागा बिल्डरच्या घशात घातली असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे. 

अनेक हास्यास्पद आरोप किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेना आणि संजय राऊत यांनी केले आहेत. कोणत्याच आरोपांचा पुरावा ते देऊ शकलेले नाहीत. खरं म्हणजे इतका प्रयत्न त्यांनी किरीट आणि त्यांच्या मुलावर एफआयआर दाखल करण्याचा केला, प्रचंड दवाब पोलिसांवरही आणला. हे पोलिसांनी त्या त्यावेळी सांगितलं की शक्य नाही.  म्हणून आता त्यांनी नविन प्रयत्न सुरु केला आहे. त्यांनी कितीही दबावाची राजनिती केली तरी भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणं किरीट सोमय्या बोलणं बंद करणार नाहीत आणि भाजपही बंद करणार नाहीत. 

शिवसेना ही काँग्रेस, राष्टवादीची कितवी टीम आहात असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी एक मुख्यमंत्रीपद घेऊन पक्षाची काय अवस्था केली आहे. आता बी  आणि सी टीमही राहिलेला नाही, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहिचं वाकून हे बंद करा असा टोलाही शिवसेनाला लगावला आहे. 

भाजपचा स्थापना दिवस
भाजपाचा आज स्थापना दिवस आहे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. स्थापना दिवसानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणाचा अजेंडा शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्याचा संदेश दिला. समतेचा आणि समरसेतचा संदेश दिला. 

ज्या परिवारवादी पार्ट्या आहेत, त्यांनी लोकशाहीला कसं आव्हान दिलं आहे आणि त्यांचा कसा मुकाबला करावा लागेल, यासंदर्भात मोदींनी माहिती दिलेली आहे. एक नविन प्रेरणा घेऊन भाजपचा कार्यकर्ता मैदानात उतरतो आम्ही निश्चितपणे भारत देशाची सेवा करण्या करता यापुढेही कटिबद्ध असू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.