निसर्ग चक्रीवादळ ५० किमी दक्षिणेला सरकले, जहाजावरील १३ जणांना वाचवले

वादळाची दिशा आणखी दक्षिणेला सरकल्यामुळे मुंबईचा धोका आणखी कमी झाला आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाची खबरदारी घेण्यात आली आहे.   

Updated: Jun 3, 2020, 01:59 PM IST
निसर्ग चक्रीवादळ ५० किमी दक्षिणेला सरकले, जहाजावरील १३ जणांना वाचवले

मुंबई : वादळाची दिशा आणखी दक्षिणेला सरकल्यामुळे मुंबईचा धोका आणखी कमी झाला आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाची खबरदारी घेण्यात आली आहे.  निसर्ग चक्रीवादळाची दिशा ५० किमी दक्षिणेला सरकली आहे. मुरुडच्या दिशेला वळलं वादळ आहे. अलिबागपासून ९५ किमीवर वादळ आले आहे. तर मुंबईला चक्रीवादळाचा धोका कमी असल्याचे दिसत आहे. दरम्यान, रत्नागिरीच्या मिऱ्या समुद्रात अडकलेलं जहाज किनाऱ्यावर धडकले असून जहाजावरच्या १३ जणांना वाचवले आहे.

मुंबईसह कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा धोका असून काही तासांत हे वादळ धडकत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, अलिबाग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी वादळासाठी प्रशासन सज्ज असून जवळपास एनडीआरएफच्या २० टीम ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. या वादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून किनार पट्टीवरील नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आले आहे. तसेच चक्रीवादळाचा परिणाम हवामानात झाला असून राज्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. 

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवरच्या घरांना मोठा धोका आहे. अलिबाग, रायगड, उरणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं पश्चिम किनारपट्टीवर तयार झालेलं निसर्ग चक्रीवादळ आज दुपारी अलिबागच्या किनाऱ्यावर धडकेल असा अंदाज आहे. यात समुद्र किनारी असणाऱ्या घरांना मोठा फटका बसू शकतो त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील १३ ५४१ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. अलिबाग किनाऱ्यालगतच्या नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे.

तसेच पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवरील गावातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या एनडीआरएफ टीमच्या मदतीने  खबरदारीच्या उपाययोजना सुरू आहेत. निसर्ग चक्रीवादळाचा फटका पालघर जिल्ह्यातील काही गावांनाही बसण्याची शक्यता आहे. यामुळे समुद्र किनाऱ्यावरील गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.