प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : युगांडा देशाची नागरिक असलेली एक महिला युगांडा ते मुंबई असा विमान प्रवास करत मुंबईला आली. पोलिसांनी तिची तपासणी केली आणि थेट तिला मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल केले.
28 मे ते 2 जून या कालावधीत डॉक्टरांनी त्या महिलेवर उपचार केले. तिच्या शरीरातून डॉक्टरांनी ज्या वस्तू काढल्या त्याची किंमत तब्बल ३ कोटी इतकी निघाली.
युगांडामधून आलेल्या त्या महिलेला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तपासणीसाठी आपल्या ताब्यात घेतले. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ती महिला अमली पदार्थाची तस्करी करत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.
त्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तिला ताब्यात घेतले. तिच्या सामानाची तपासणी केली. मात्र, त्या सामानात काही आक्षेपार्ह आढळले नाही. परंतु, ती महिला काहीतरी लपवत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.
अधिकाऱ्यांनी तिची कसून चौकशी केली असता तिने आपल्या शरीरात अमली पदार्थ लपवून त्याची तस्करी करत असल्याचे मान्य केले. अधिकाऱ्यांनी तिला तातडीने जे. जे. रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी 28 मे ते 2 जून या काळात तिने गिळलेल्या 64 कॅप्सूल शरीरातून बाहेर काढल्या.
त्या कॅप्सूलमधून 535 ग्रॅम हिरोईन आणि 175 ग्रॅम कोकिन हे अमली पदार्थ निघाले. ज्याची किंमत सुमारे ३ कोटी इतकी आहे. ही महिला नेमकी कोणाला ते अमली पदार्थ पुरवणार होती आणि यापूर्वी देखील तिने असे काम केले आहे का याचा तपास नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो करत आहे.