7 तासांनंतर ईडी कार्यालयातून बाहेर, अनिल परब यांनी सांगितलं काय झालं चौकशीत

अनिल देशमुख यांच्या विरोधात सुरू असलेल्या मनी लाँड्रिग प्रकरणात अनिल परब यांची ईडीकडून चौकशी

Updated: Sep 28, 2021, 07:20 PM IST
7 तासांनंतर ईडी कार्यालयातून बाहेर, अनिल परब यांनी सांगितलं काय झालं चौकशीत title=

मुंबई : शंभर कोटी वसुली प्रकरणात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना ईडीने (ED) समन्स बजवून मंगळवारी हजर राहण्यास सांगितले होतं. त्यानुसार आज अनिल परब हे ईडी कार्यालयात हजर झाले. ईडीकडून तब्बल सात तास अनिल परब यांची चौकशी करण्यात आली. संध्याकाळी सातवाजता ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. 

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ईडीच्या सर्व प्रश्नांना आपण उत्तर दिल्याचं म्हटलं. 'आज मला जे समन्स आलं होतं, त्या समन्सच्या अनुषंगाने मी ईडी कार्यालयात आलो, आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला जे प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. ईडी ही एक अॅथोरिटी आहे, आणि अॅथोरिटीला उत्तरं देणं ही माझी जबाबदारी आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

मी सहकार्य करणार, कारण मला प्रश्न विचारण्याचा अधिकार अॅथोरिटीला आहे, कोणा एका व्यक्तीला नाही, आणि म्हणून अॅथोरिटी जे प्रश्न विचारेल त्याला उत्तरं दिली आहेत असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं. 

अनिल परब यांच्यावर आरोप

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सुरू असलेल्या मनी लाँड्रिग प्रकरणात चौकशी करण्यासाठी अनिल परब यांनाही ईडीने समन्स पाठवले आहे. मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात अनिल परब यांना 20 कोटी रूपये मिळाल्याचा आरोप निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने केला होता. त्यासंबंधी ईडीने अनिल परब यांची चौकशी केली.