कृष्णात पाटील, मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी सर्वात लहान तलाव असलेला तुळशी ओव्हर फ्लो झाला आहे. १८७९ मध्ये ४० लाख रुपये खर्चून तुळशी तलाव बांधण्यात आला होता. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या आणि बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा तुळशी तलाव दिनांक आज २७ जुलै रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे.
८०४६ दशलक्ष लीटर उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गतवर्षी दिनांक १२ जुलै, २०१९ रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच वर्ष २०१८ मध्ये दिनांक ९ जुलै रोजी, वर्ष २०१७ मध्ये दिनांक १४ ऑगस्ट रोजी आणि वर्ष २०१६ मध्ये १९ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता. बृहन्मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (१.८ कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो.
गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
- बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे ३५ किलोमीटर (सुमारे २२ मैल) अंतरावर हा तलाव आहे.
- या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८७९ मध्ये पूर्ण झाले.
- या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.
- या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.७६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते.
- तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लीटर एवढा असतो. (८०४६ दशलक्ष लीटर)
- हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते.