कोरोनामुळे यंदा दहीहंडी साजरी न करण्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं आवाहन

पुढील वर्षी हा उत्सव एकदम जल्लोषात व उत्साहात साजरा करु असं देखील नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

Updated: Jul 28, 2020, 03:22 PM IST
कोरोनामुळे यंदा दहीहंडी साजरी न करण्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं आवाहन title=

मुंबई : यंदा देशात कोरोनाचं सावट असल्याने एकत्र येणं कठीण झालं आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या तरी कोरोनावर कोणती लस विकसित झाली नसल्यामुळे सोशल डिस्टंसिंग हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे कोरोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केलं होतं. पण अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे लॉकडाऊन शिथिल करत हळूहळू गोष्टी पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न होत आहे. असं असलं तरी कोरोनाचा धोका अजून कमी झालेला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी काळजी घेण्याची गरज आहे.

भारतात अऩेक सण उत्साहाने साजरे केले जातात. त्यातच दहीहंडी जवळ येत आहे. पण कोरोनामुळे दहीहंडी साजरी न करण्याचं आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ज्या सणाची आपण वर्षेभर वाट पाहत असतो तो "दहीहंडी" चा सण लवकरच येत आहे. मी स्वतः गोविंदा असल्याने या सणाचे असलेले महत्त्व व उत्सुकता दोन्ही जाणून आहे. आमचा पक्ष हा कायमच आपले सर्व हिंदू सण थाटात, उत्साहात साजरे करावे हीच भूमिका वर्षानुवर्षे मांडत आला आहे. आम्ही कायमच या सणासाठी, त्यात असलेल्या विविध अडचणी प्रसंगी उदा.-गोविदांनी किती थर लावावे हा विषय मध्यंतरी आला होता, अशा प्रत्येक वेळी गोविंदांच्या बाजूनेच ठामपणे आमचा पक्ष कायम उभा राहिला. परंतु मित्रांनो यावेळी परिस्थिती ही अतिशय वेगळी आहे, या कोरोना (विषाणू) महामारी मुळे यावर्षी आपण सर्वांनी जाहीर दहीहंडीचा उत्सव साजरा करू नये.' असं आवाहन त्यांनी केलं आहे.

'यावर्षी जरी आपला हिरमोड होणार असला तरी पुढील वर्षी हा उत्सव आपण एकदम जल्लोषात व उत्साहात साजरा करून ती कसर भरून काढूच. परंतु यावर्षी संयमी भूमिका घेऊन कोरोना महामारीला आळा घालूया. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक व महाराष्ट्रातील इतरही शहरात दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांना व समस्त महाराष्ट्रातील बालगोपाळाना नम्र विनंती. यासंदर्भात मी स्वतः फोनद्वारे मुंबई दहीहंडी समन्वय समितीतील' अनेक सदस्यांशी बोलून त्यांना देखील ही विनंती केलेली आहे.' असं देखील बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.