मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन थकल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. वेळोवेळी राज्य सरकारकडून आश्वासन देण्यात येते. मात्र, केवळ हे आश्वासनच असते. ग्रामीण विकास, महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी सेविकांना मोठे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांना याचा विसर पडल्याची टीका करण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयाकडे बजेटच नसल्याने राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे काही महिन्यांचे मानधन थकले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी सोमवार ३ सप्टेंबरपासून आंदोलन करणार आहेत, तसा इशारा देण्यात आलाय.
अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांवर सरकारच्या माध्यमातून अनेक जबाबदारीची कामे सोपविली जातात. गरोदर मातांपासून ते सहा वर्षांच्या मुलांपर्यंतच्या सगळ्या नोंदी, लसीकरण, विविध कार्यक्रम घेणे, शाालेय पोषण आहार, अशी कामे करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना शासनाकडून अल्प मानधन देण्यात येत आहे. मात्र, जास्तीची कामे करुन घेतली जातात. तसेच असे असतानाच आता काही महिन्यांचे मानधन थकले आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झालाय.
गतवर्षीपासून त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. मात्र, तेव्हापासून मानधन जमा होण्यातील घोळही वाढले आहेत. तर अनेकांना अर्धेच मानधन खात्यात जमा होत आहे. आता ऑगस्ट महिना संपला तरी त्यांचे जुलै महिन्याचे मानधन खात्यावर जमा झालेले नाही. त्यामुळे राज्यातील जवळपास दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनिसांवर संक्रांत आली आहे. त्यांना महागाईत आर्थिक अडचणींना सामोरे लागत आहे.
दरम्यान, जुलै महिन्यात शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार २५ पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या अंगणवाड्या बंद करण्यात येणार आहेत. तेथील अंगणवाडी सेविका व मदतनिसांना अन्य रिक्त पदांवर सामावून घेण्यात येणार आहे. याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.