मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत गेलेल्या 50 आमदारांमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमांमधून महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना संबोधित करताना आपण यापुढे नियमित शिवसेनाभवनात भेटू असं सूचित केलं होतं.
याचीच सुरुवात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केली. तेव्हापासून शिवसैनिकांच्या भेटीचा हा शिकस्ता शिवसेनाभवन आणि मातोश्रीवर सुरू आहे.
बंडखोर आमदार आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या पदाधिकऱ्यांमुळे संघटनेत अनेक अंतर्गत बदल करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. याचबरोबर विभागवार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका, जिल्हा पातळीवरील विभागवार बैठका उद्धव ठाकरे घेत आहेत. येत्या काळात नवीन पदाधिकारी नियुक्त करतानाच संघटनात्मक बांधणीसाठी विभागवार मेळावे घेण्याचा मानसदेखील महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेनाभवन इथे व्यक्त केला.
बैठका - मार्गदर्शन आणि कौतुक
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर बंडखोर आमदार आणि पदाधिकारी फुटल्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरे विषेश लक्ष देताना दिसत आहेत. आजपासून तीन-तीन विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन मार्गदर्शन करून पक्ष बांधणी मजबूत करण्यास उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केली आहे.
यापुढे दररोज दोन ते तीन विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन आणि निवडणुकींच नियोजन तसंच पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे उद्धव ठाकरे कौतुक करणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळत आहे.