मुंबई : मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये अजूनही एकमत झालेलं नाही. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे. दुसरीकडे भाजप मुख्यमंत्रिपद कोणत्याही परिस्थितीत सोडण्यास तयार नाही. शिवसेना ५०-५० च्या फॉर्म्युल्यासाठी ठाम आहे तर, अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची शिवसेनेची मागणी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी फेटाळून लावली आहे. भाजप शिवसेनेसमोर नवा प्रस्ताव ठेवण्याची मनस्थितीत आहे. अमित शाहांच्या मुंबईतल्या भेटीत हा प्रस्ताव ठेवला जाणार असून त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे आज झालेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी सणसणीत विधान केलं आहे. 'कुणी मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घालून आला असल्याचं समजण्याचं कारण नाही.' असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
'शिवसेनेला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद असा शब्द कधीच दिला नव्हता. सरकार भाजपच्याच नेतृत्वाखाली स्थापन होईल.' मुख्यमंत्र्यांचे हेच ते शब्द आणि हेच ते वाक्य, ज्यामुळे शिवसेना नेतृत्वाचं मन दुखावलं गेलं. मुख्यमंत्री नेमके दिवाळीदिवशी बोलले आणि युतीच्या फराळात मिठाचा खडा पडला. तीच सल उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली.
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'माझं जे अमित शाहांबरोबर ठरलंय ते करावं. आम्ही स्थिर सरकार देऊ. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीदिवशी अनऔपचारिक गप्पांमध्ये असं वक्तव्य करायला नको होतं. शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मी सगळ्याच पक्षांच्या संपर्कात आहे. आपण मित्रपक्षाला शत्रूपक्ष मानत नाही. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर चर्चा फिसकटली, पण मला खात्री आहे सगळं सुरळीत होईल,' असं म्हणतानाच कुणीही मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घेऊन आलं नाही, असा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
एक पाऊल मागे घेणार नाही, यावर शिवसेना ठाम आहे. शिवसेनेचं काय करायचं, हे भाजपाचंही ठरलं आहे. कुठल्याही परिस्थितीत अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला नसेल. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह ८ कॅबिनेट मंत्रिपदं आणि ८ राज्यमंत्रिपदांचा प्रस्ताव देण्यात येईल. केंद्रातही शिवसेनेला एक मंत्रिपद वाढवून दिलं जाईल.
पुढच्या चार दिवसांत अमित शाह मुंबईत येतील आणि मातोश्रीवर हा सगळा आध्याय संपेल, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. खरंतर महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर, सत्ता स्थापनेवर इतका वाद व्हायची आवश्यकता आहे का, याचं परीक्षण शिवसेना, भाजप या दोन्ही पक्षांनी करण्याची गरज आहे.