मुंबई: गेल्या साडेचार वर्षांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेना आणि भाजपने अखेर सोमवारी युतीची घोषणा केली. मुंबईतील संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत ही घोषणा झाली. मात्र, भाजपशी युती करण्याला शिवसेनेच्या अनेक नेत्यांचा आणि शिवसैनिकांचा विरोध होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी युती करण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेना आणि भाजप यांच्यात गेल्या २५ वर्षांपासून घट्ट नाते आहे. गेल्या काही काळात आम्ही जवळीक आणि संघर्ष अशा दोन्ही प्रकारचा अनुभव घेतला. मात्र, सैद्धांतिकदृष्ट्या आमचा विचार एक आहे. अशावेळी उगाच काही गैरसमजांमुळे आम्ही भांडत राहिलो तर, गेली ५० वर्षे ज्यांचा विरोध केला त्यांच्या हातात देशाची सत्ता जाईल. त्यामुळे अशा अविचारी लोकांना रोखण्यासाठी आम्ही समविचारी एकत्र येत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शिवसेना-भाजपचे मनोमीलन; लोकसभेला २३-२५, विधानसभेला ५०-५० चा फॉर्म्युला
यावेळी उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांनी यापूर्वीच्या भांडणांना मूठमाती देत असल्याचे जाहीर केले. मात्र, हे कटू अनुभव आम्ही कायम लक्षात ठेवू. जेणेकरून पुन्हा अशी परिस्थिती उद्भवणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केल्याप्रमाणे मार्गदर्शक म्हणून मी नेहमीच वैयक्तिकरित्या सरकारला सल्ले देत आलो. मात्र, आता युती झाल्याने आपण उघड आणि उजळ माथ्याने देशभरात फिरू शकतो, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भातही भाष्य केले. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान वाया जाणार नाही, आपला देश लेचापेचा नाही, हे सरकारने पाकिस्तानला दाखवून द्यावे, अशी अपेक्षा उद्धव यांनी व्यक्त केली.