मुंबई : पुण्यातील 'पगडी'च्या राजकारणावरुन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जोरदार टोला लगावला. राजकारणासाठी स्वत:ची डोकी वापरा, दैवतांच्या पगड्या नको, असे म्हणत शरद पवार यांना चिमटा काढला. उद्धव हे शिवसेनेच्या ५२ वर्धापनदिन मेळाव्यात बोलत होते.
पुण्यात झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये पुणेरी नव्हे तर फुले पगडीचा वापर करा, असे सांगितले होते. यावरुन विरोधकांनी शरद पवार यांच्यावर जातीय राजकारणाचा आरोप केला होता. त्यानंतर पवार यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. मी पुण्याचाच आहे. मी पुण्यात शिकलो. याचा मला अभिमान आहे, असे सांगत मी कोणत्याही जातीचे प्रतिनिधी केलेले नाही, असे पवार यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले.
पवारांच्या पुण्यातील 'पगडी' राजकारणाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. टिळक किंवा फुले हे पगड्यांमुळे मोठे झाले नाहीत. तर त्यांच्यामुळे या पगड्या मोठ्या झाल्या. केवळ डोक्यावर पगडी घालून लोकमान्य टिळक किंवा महात्मा फुलेंसारख्या लोकांचे विचार डोक्यात शिरणार नाहीत. तुम्हाला लोकमान्यांची पगडी नको, पण इफ्तारची 'टोपी' कशी चालते?, असा सवालही उद्धव यांनी विचारला.