Uddhav Thackeray Security : राज्याच्या राजकारणात दर दिवशी एक नवी घडामोड पाहायला मिळत असतानाच आता भाजपशी हातमिळवणी केलेला शिंदे गट दिवसागणिक ठाकरे गटाची डोकेदुखी आणखी वाढवतानाच दिसत आहे. त्यातच बुधवारी पुन्हा एकदा भर पडली. जिथं राज्य सरकारनं ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आलीय. ही सुरक्षा 'झेड प्लस'वरून 'वाय'वर आणण्यात आली.
इतकंच नव्हे, तर 'मातोश्री' या त्यांच्या निवासस्थानी असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली. सोबतच उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यात असणाऱ्या एस्कॅार्ट गाडी, पायलट, एसआरपीएफ सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला गेला.
सूत्रांच्या माहितीनुसार राज्याच्या गृह विभागाकडून यासंदर्भातील निर्णय घेतला गेला. असं असलं तरीही अद्याप त्यासंबंधीचं कारण मात्र पुढे आलेलं नाही. इथं ठाकरेंच्या सुरक्षेत कपात केली असली तरी या गटाशी आणि या कुटुंबाशी जवळीक असणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र जैसे थे ठेवण्यात आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मिलिंद नार्वेकर हे शिवसेना सचिव तसंच उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायकही आहेत.
इथं पक्षातील महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीची आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा कमी करण्यात येते तरीही त्यांच्या स्वीय सहायकाच्या सुरक्षेला धक्काही लागत नाही ही बाब मात्र अनेकांच्याच पचनी पडत नाहीये. इतकंच नव्हे, तर येत्या काळात भाजप आणि शिंदे गटाची ही खेळी पाहता नार्वेकर ठाकरेंपासून दुरावा पत्करणार का हाच प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, नार्वेकरांच्या सुरक्षेबाबत असा लक्षवेधी निर्णय घेतला जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. कारण, मागील वर्षी मविआला धक्का देत राज्य शासनानं संजय राऊत, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांच्यासह काही महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली होती. पण, मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत मात्र त्यावेळी वाढ करण्यात आली होती. सुरुवातीला त्यांना 'एक्स' दर्जाची सुरक्षा होती, ज्यानंतर त्यातच बदल करत ही सुरक्षा वाढवून 'वाय प्लस' करण्यात आली होती. ज्यानंतर आता ठाकरे गटाची सुरक्षा कमी झाली असली तरीही नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र कोणतेही बदल नसल्याचं स्पष्ट होत आहे.