उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना जाहीररित्या जोडे मारावेत- रणजीत सावरकर

नेहरूंच्या काळापासून काँग्रेस हा गुलामांचा पक्ष आहे.

Updated: Dec 14, 2019, 07:36 PM IST
उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना जाहीररित्या जोडे मारावेत- रणजीत सावरकर

मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहिररित्या जोडे हाणावेत, असे वक्तव्य सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांनी केले. ते शनिवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर टीकेची तोफ डागली. नेहरूंच्या काळापासून काँग्रेस हा गुलामांचा पक्ष आहे. त्यामुळे गुलामांच्या पक्षाकडून मला वेगळी अपेक्षा नाही. मात्र, सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना जोड्याने मारू, हा शब्द उद्धव ठाकरे यांनी पाळला पाहिजे. माझा त्यांच्यावर अजूनही विश्वास आहे. राहुल गांधी यांना मुंबईत आणून शिवसैनिकांनी त्यांना जोडे हाणायला पाहिजेत, असे रणजीत सावरकर यांनी म्हटले. त्यामुळे आता शिवसेना यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

उद्धव ठाकरे सत्तेसाठी हिंदुत्त्वाची कास सोडणार नाहीत- रणजीत सावरकर

तत्पूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून सावरकर यांच्याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, अशा इशाराच काँग्रेसला दिला. वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. स्वातंत्र्यासाठी नेहरू, गांधी यांच्याप्रमाणे सावरकरांनीही जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान झालाच पाहिजे. इथे तडजोड होणार नाही, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले होते. 

मनमोहन सिंगांचे 'ते' विधान म्हणजे काँग्रेसचा दुटप्पीपणा- रणजीत सावरकर

त्यामुळे आता महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांच्या विचारसरणीत असलेल्या फरकामुळे ते एकत्र कसे नांदणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याचे प्रत्यंतर आता येताना दिसत आहे.