'नैसर्गिक युती'साठी ठाकरेंचं एक पाऊल पुढे? मविआमधून शिवसेनेचा 'एक्झिट प्लॅन'?

पक्ष वाचवण्याच्या भूमिकेतून विरोधकांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ

Updated: Jul 12, 2022, 08:12 PM IST
'नैसर्गिक युती'साठी ठाकरेंचं एक पाऊल पुढे? मविआमधून शिवसेनेचा 'एक्झिट प्लॅन'? title=

Maharashtra Politics : आमदारांच्या बंडानंतर आता खासदारांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अखेर भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा जाहीर केलाय. मातोश्रीवर झालेल्या माजी आमदारांच्या बैठकीत ठाकरेंनी हे सांगितल्यानंतर आता चर्चा सुरू झालीये ती नैसर्गिक युतीची. 

भाजपसोबत (BJP) पुन्हा युती करावी, ही मागणी करत पक्षाचे तब्बल 40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत (CM Eknath Shinde) गेले. तर खासदारांच्या बैठकीत भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी पुढे आली. या मागणीला पक्षप्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीत आहे. UPAचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेत शरद पवारांनी (Sharad Pawar) स्वतः लक्ष घातलं होतं. त्यामुळे यशवंत सिन्हांना (Yashwant Sinha) शिवसेना पाठिंबा देणं अपेक्षित होतं. मात्र भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा महा विकासआघाडीतून एक्झिट प्लॅन आहे का, अशी चर्चा सुरू झालीये. 

शिवसेनेनं यापूर्वीही 2 वेळा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आघाडी केलेल्या मित्रपक्षाच्या विरोधात मतदान केलंय. 2007मध्ये मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेनं काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर 2012मध्ये प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देत शिवसेनेनं भाजपच्या उमेदवाराविरोधात मतदान केलं होतं. 

मात्र यावेळी पक्ष वाचवण्याच्या भूमिकेतून विरोधकांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ शिवसेनेवर आलीय. आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता खासदारांची भूमिका स्विकारण्याशिवाय उद्धव ठाकरेंसमोर पर्याय नव्हता. मात्र ही ठाकरेंची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आणि एनडीएत प्रवेशाची रणनीती तर नाही ना याचीच चर्चा रंगू लागली आहे.