नाराज पार्थ पवार सुप्रिया सुळेंच्या भेटीला 'सिल्व्हर ओक'वर

उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार हे सिल्व्हर ओक बंगल्यावर सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. 

Updated: Aug 13, 2020, 08:03 PM IST
नाराज पार्थ पवार सुप्रिया सुळेंच्या भेटीला 'सिल्व्हर ओक'वर

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार हे सिल्व्हर ओक बंगल्यावर सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पार्थ पवार कमालीचे नाराज झाले आहेत. त्यामुळे पार्थ पवार मोठा निर्णय घ्यायच्या तयारीमध्ये आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

शरद पवारांच्या वक्तव्याने पार्थ दुखावले, लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या मताला काडीची किंमत नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी काल केलं होतं. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांची मालिका सुरू झाली. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर काल लगेचच सिल्व्हर ओकवर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक झाली. 

काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमधूनही अजित पवार मध्येच निघून गेले, त्यामुळेही अनेक चर्चा सुरू झाल्या. पण मंत्रिमंडळाची बैठक लांबल्यामुळे आणि अजित पवारांचं पूर्वनियोजित काम असल्यामुळे मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीतून निघाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. 

दरम्यान आज दुपारीही सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली. जवळपास १० मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मतदारसंघाच्या कामासाठी सुप्रिया सुळे अजित पवारांना भेटल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार, पार्थ पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्यापैकी कोणीच प्रतिक्रिया दिलेली नाही.