वंदे भारत एक्सप्रेसला सलग दुसऱ्या दिवशी अपघात; अशी झाली ट्रेनची अवस्था

गांधीनगरहून मुंबईला जात असताना हा अपघात झालाय

Updated: Oct 7, 2022, 06:53 PM IST
वंदे भारत एक्सप्रेसला सलग दुसऱ्या दिवशी अपघात; अशी झाली ट्रेनची अवस्था title=

वंदे भारत (Vande Bharat express) या स्वदेशी बनावटी ट्रेनचा सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला आहे. गुजरातमध्ये (gujarat) शुक्रवारी सलग दुसऱ्यांदा गुरांना ट्रेनने धडक दिली आहे. या धडकेमुळे ट्रेनच्या पुढील भागाचे पुन्हा किरकोळ नुकसान झाले. गांधीनगरहून (gandhinagar) मुंबईला (Mumbai) जात असताना कंझरी आणि आनंद स्थानकादरम्यान हा अपघात झाला. याआधी मणिनगर स्थानकाजवळ म्हशींच्या कळपाला रेल्वेची धडक बसली होती. दुरुस्तीनंतर ही गाडी आज पुन्हा रुळावर आणण्यात आली होती. मात्र आता पुन्हा या ट्रेनचा अपघात झालाय.

गुजरातमध्ये गुरुवारी सकाळी वंदे-भारत एक्सप्रेस ट्रेनने म्हशींच्या कळपाला धडक दिल्यानंतर रेल्वे संरक्षण दलाने (RPF) या गुरांच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पश्चिम रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  म्हशींच्या कळपाला धडकल्यानंतर झालेल्या नुकसानाची दुरुस्ती करण्यात आली आहे. या अपघातात चार म्हशींचा मृत्यू झाला. पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ प्रवक्ते (अहमदाबाद विभाग) जितेंद्र कुमार जयंत म्हणाले, "आरपीएफने अहमदाबादमधील वाटवा आणि मणिनगर रेल्वे स्थानकांदरम्यान वंदे भारत ट्रेनच्या मार्गावर येणाऱ्या म्हशींच्या अज्ञात मालकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे."

दरम्यान,  रेल्वे रुळांजवळ गुरे चरण्यास घेऊन जावू यासाठी स्थानिकांची समजूत काढण्यात येईल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ही मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणारी सेमी सुपरफास्ट रेल्वे आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 सप्टेंबर रोजी गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या सेमी-हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या नवीन आणि अपग्रेड आवृत्तीला हिरवा झेंडा दाखवला होता. देशातील ही तिसरी वंदे भारत ट्रेन आहे. ही ट्रेन ताशी 180 किमी वेगाने धावू शकते, परंतु सध्या कमाल वेग 130 किमी प्रतितास ठेवण्यात आला आहे. गांधी नगर ते मुंबई दरम्यानची ट्रेन सुमारे साडेसहा तासांत हा दुसरा भाग व्यापते.