Prakash Ambedkar MVA : प्रकाश आंबेडकर मविआसोबत जाणार - सूत्र

राज्य सरकारला (Maharashtra Government) जोरदार आव्हान देण्यासाठी नवं  राजकीय समीकरण पहायला मिळतंय. 

Updated: Dec 5, 2022, 06:12 PM IST
Prakash Ambedkar MVA : प्रकाश आंबेडकर मविआसोबत जाणार - सूत्र title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्याच्या राजकारणातून (Maharashtra Politics) अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या (Bmc Election 2022) पार्श्वभूमीवर आणि राज्य सरकारला (Maharashtra Government) जोरदार आव्हान देण्यासाठी नवं  राजकीय समीकरण पहायला मिळतंय. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे महाविकास आघाडीसोबत (MVA) जाण्यासाठी तयार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता वंचितला (VBA) सोबत घ्यायचं की नाही, याबाबत मविआच्या बैठकीत ठरणार आहे. (vba vanchit bahujan aghadi prakash ambedkar is with mva mahavikas aghadi source info maharashtra politics) 

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा झाली. या बैठकीत आंबेडकरांनी मविआसोबत जाण्याबाबत सकारात्मकता दर्शवली. त्यामुळे आता मविआतील प्रमुख पक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात चर्चा होणार आहे. विरोधी पक्षनेता अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी मविआची बैठक सुरु आहे. बैठकीला तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि पहिल्या फळीतील नेते उपस्थित आहेत.

ठाकरे-आंबेडकरांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात एक तास बंद दाराआड चर्चा झाली. हॉटेल ग्रँड हयातमध्ये केवळ दोघांमध्येच चर्चा झाली. यानंतर आता वंबआला मविआत घ्यायचं की नाही, याबाबत बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो, हे महत्त्वाचं ठरणार आहे.  

 

शिवशक्ती-भीमशक्ती आल्यास फायदा कुणाला? 

दरम्यान उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्याचा फायदा नेमका कुणाला होईल हे आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेऊयात.  

काँग्रेस-राष्ट्रवादीला 2019च्या निवडणुकीत वंचितचा फटका बसला होता. तो फटका आता बसणार नाही. मतांचं विभाजन टळेल. 

मुंबईत मुलुंड, घाटकोपर, गोवंडी, देवनार, चेंबूर परिसरात दलित मतांचा प्रभाव आहे. याचा फायदा मविआला होईल.  

वंचित 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतल्या मतदारसंघात तिस-या किंवा चौथ्या क्रमांकावर होती. 

वंचिताच्या उमेदवाराला 78 विधानसभा मतदारसंघात सरासरी 25 ते 35 हजार मतं मिळाली होती.  तर 18 विधानसभा मतदारसंघात सरासरी 15 हजारहून अधिक मतं होती.  तसेच 60 विधानसभा मतदारसंघात सरासरी 10 हजाराहून अधिक मतं मिळाली.  तर उर्वरित 132 विधानसभा मतदारसंघात सरासरी नऊ हजारांवरून अधिक मतं होती. 

सांगली, सोलापूर, परभणी,गडचिरोली, चिमूर, बुलढाणा, हातकणंगले या लोकसभेच्या 7 जागांवर वंचितला लाखाहूनही अधिक मतं होती. वंचितला लोकसभा निवडणुकीत एकूण मतदानाच्या 4.57% मतं पडली होती.  लोकसभेला 50 लाखांपेक्षा अधिक मतं वंचित बहुजन आघाडीला मिळाली होती.  आता भीमशक्ती मविआसोबत आली तर मतांचं विभाजन टळेल. परिणामी याचा फायदा हा मविआला होईल. तसेच शिंदे सरकारला टफ फाईट देण्यासाठी मविआला आणखी बळ मिळेल.