मुंबई : भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झालेली नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मात्र, भेटीमागे राजकीय गणिते असल्याचे स्पष्ट झालेय. विधान परिषद निवडणुकीसाठी सेनेकडे पाठिंब्याची मागणी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची सुमारे दीड तास चर्चा झाली. ही चर्चा झाल्यानंतर बाहेर आल्यावर चंद्रकांत पाटील यांनी चर्चेचा तपशिल गुलदस्त्यातच ठेवणं पसंत केलं. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
दरम्यान, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा करतानाच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबाबत चर्चा करण्याइतपत मी मोठा नाही, अशी टिप्पणी करत पाटील यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले होते. मात्र, येत्या सात डिसेंबरला होणाऱ्या पोट निवडणुकीत भाजपच्या उमेदवारासाठी शिवसेनेच्या पाठिंब्याची मागणी या भेटीत करण्यात आल्याचं बोललं जातंय.
मात्र, विधानपरिषद पोटनिवडणुकीत नारायण राणे यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम असल्याने भाजपने आपल्या उमेदवारांची चाचपणी सुरु केल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप उमेदवाराला पाठिंबा द्यावा, या मागणीसाठी चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु अधिकृत कोणीही काहीही सांगण्यास नकार देत आहे. त्यामुळे या भेटी मागील खरं काय कारण ते समजू शकलेले नाही.