प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई : 'ललीत कला अकादमी'च्या राष्ट्रीय पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ५९ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात मूर्तीकला, ग्राफिक्स, फोटोग्राफी, पेंटींग प्रकारातील दिग्गजांची कलाकृती पाहायला मिळाली.
मुंबईतील विक्रांत भिसे या संवेदनशील कलाकाराला पेंटींग प्रकारातील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याच्या 'इम्प्रेशन' या कलाकृतीसाठी गौरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनातून १५ राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आले. देशातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी हा पुरस्कार मानला जातो.
यंदाच्या या पुरस्काराने सन्मानित झालेला विक्रांत हा महाराष्ट्र राज्यातील एकमेव कलाकार आहे. ५ वर्षानंतर महाराष्ट्रात हा राष्ट्रीय पुरस्कार आला आहे.
विक्रांतला याआधी महाराष्ट्र राज्यय पुरस्कार, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, ऑल इंडिया फाईन आर्ट्स अॅण्ड क्राफ्ट सोसायटी अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यावर्षी मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराने त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
रोजच्या जीवनातील सामान्य माणसाची धडपड. चळवळ, समाजात घडणारे बदल तो आपल्या चित्रातून रेखाटत असतो.
व्यक्त होण्यासाठी तो पेपर कटींग, कोलाज अशा विविध माध्यमांचा उपयोग करत असतो.
विक्रांतच्या कलाकृतीचे संकलन भारतातच नव्हे तर युरोप, इटलीतील कंटेपररी आर्ट म्युझीअमध्येही करण्यात आले आहे.