मुंबई : एरवी नेहमी आरोप करण्यात अग्रेसर असलेले भाजपा खासदार किरीट सोमय्या सध्या वादात सापडलेत. एलफिन्स्टन ब्रिज दुर्घटनेच्या रात्री मुलुंडला गरब्यामध्ये दंग झालेल्या सोमय्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावर शिवसेनेनं टीका सुरू करताच महापौरांनी त्याच रात्री दोन संघांना पार्टी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल करत भाजपानं प्रत्युत्तर दिलं... शिवसेना-भाजपामधल्या कलगीतुऱ्यानं नवं वळण घेतल्याचं बघायला मिळालं.
नवरात्रीचा नववा दिवस... दुसऱ्या दिवशीच्या दसऱ्याची लगबग.... आणि अशा वेळी गेल्या दोन-तीन वर्षांपासून ज्याची भीती होती तेच झालं. एलफिन्स्टन स्थानकात मृत्यूनं तांडव घातलं. चेंगराचेंगरीमध्ये निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला. हाददरलेल्या मुंबईकरांनी त्या रात्री एलफिन्स्टन ब्रिजवर मेणबत्या लावून मृतांना श्रद्धांजली वाहिली. अनेक ठिकाणी गरबा रद्द झाला... दुर्घटनेमुळे मुंबईकरांच्या मनात आक्रोश होता तसाच रागही होता. यावेळी रेल्वेचे प्रश्न हिरिरीनं मांडणारे खासदार किरीट सोमय्या कुठे आहेत? असा प्रश्नही सोशल मीडियावर विचारला जाऊ लागला. लगेच दुसऱ्या दिवशी सोमय्या गरबा खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सोमय्यांविरोधात टीकेचा भडिमार सुरू झाला.
सोमय्यांनी या टिकेला उत्तर देणं टाळलं. मात्र, हा व्हिडिओ शिवसेनेनं लिक केला असावा, अशा शक्यतेतून भाजपा पलटवार करण्याची संधी शोधत होताच... महापौर बंगल्यावर झालेल्या पार्टीनं भाजपाला आयतं कोलित मिळालं.
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावलाय. एलफिन्स्टन दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर फुटबॉल खेळाडूंसाठी ठेवण्यात आलेल्या भोजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. मात्र 'अतिथी देवो भव' या भावनेतून केवळ चहा-पान केल्याचा दावा महापौरांनी केलाय.
प्रत्येक घटनेचं राजकारण करण्याची वाईट सवय आपल्या नेत्यांना लागलीय. एलफिन्स्टनची घटनाही याला अपवाद नाही. पण यावेळी केवळ आरोप-प्रत्यारोप करून शिवसेना-भाजपा थांबलेले नाहीत, तर एकमेकांची असंवेदनशीलता दाखवणारे व्हिडिओ व्हायरल करण्याचा नवा पायंडा या निमित्तानं राज्याच्या राजकारणात बघायला मिळाला.