Multibagger Stock 2023: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना अनेकदा मोठा फायदा होतो. मात्र या गुंतवणूकीमध्ये जोखीम असते. तरीही विचारपूर्वक गुंतवणूक करणाऱ्यांना शेअर बाजारातून चांगली कमाई करता येते असं अनेक उदाहरणांमधून वेळोवेळी दिसून आलं आहे. काही कंपन्यांचे शेअर्स अल्पावधीमध्ये गुंतवणूकदारांना चांगले रिटर्नस देतात. तर काही शेअर्ससंदर्भात संयमी भूमिका म्हणजेच लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असतं. अशा शेअर्समध्ये मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास त्यातून नक्कीच अपेक्षेपेक्षाही अधिक रिटर्नस देतात. अशाच एका कंपनीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या कंपनीने गुंतवणूकदारांना 3 वर्षांमध्ये 7973 टक्के परतावा दिला आहे. या सोलर स्टॉकमध्ये 3 वर्षांपूर्वी पैसे लावणारे आज लखपती झालेत.
आपण ज्या शेअर बद्दल बोलत आहोत त्याचं नाव आहे वारी रिन्यूएबल टेक्नोलॉजिस लिमिटेड! (Waaree Renewable Technologies Ltd) या कंपनीच्या शेअरने केवळ 3 वर्षांमध्ये गुंतवणुकदारांना मालामाल केलं आहे. एकेकाळी या शेअरची किंमत केवळ 16 रुपये इतकी होती. आज या शेअरची किंमत 1300 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या कंपनीचा शेअर 17 ऑगस्ट 2020 रोजी बाजार बंद झाला तेव्हा 16.26 रुपये प्रती शेअर दाराला होता. आज म्हणजेच 18 ऑगस्ट 2023 च्या दिवसाचा कारभार सुरु झाला तेव्हा या शेअर्सचा भाव कालच्या तुलनेत 1.32 टक्क्यांनी वधारुन 1,330 वर पोहोचला होता. म्हणजेच 2020 साली या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याच्या परतावा म्हणून 80 लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळाली असती.
एका वर्षापूर्वी म्हणजेच, 17 ऑगस्ट 2022 रोजी 52 आठवड्यांच्या लोअर लेव्हलला 354.50 वर ट्रेड करत होता. तर 28 जुलै 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 1338 रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचला. कंपनीने एकूण 0.36 लाख शेअर्समध्ये 4.77 कोटींचा व्यवहार केला होता. बीएसईवर कंपनीची मार्केट कॅप 2732.36 कोटी इतकी झाली.
वारी रेन्यूएबलचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (आरएसआय) 52.2 वर आहे. यावरुनच कंपनीची स्थिती ओव्हरब्रॉट म्हणजेच अधिक खरेदी होतेय किंवा ओव्हर ओव्हरसोल्ड म्हणजेच विक्री अधिक होतेय या पैकी एकाही झोनमध्ये नाहीय. या कंपनीचा एका वर्षाचा बीटा इंडेक्स 0.4 आहे. म्हणजेच वर्षभरामध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत तुलनेनं फार स्थिर आहे असं यातून स्पष्ट होतंय.
वारी रिन्यूएबल्स टेक्नोलॉजीज लिमिटेड (WRTL) ला रिन्यूएबल्स लिमिटेड नावानेही ओळखलं जातं. ही वारी ग्रुपची सहाय्यक कंपनी असून ती सोलार ईपीसी बिझनेसमध्ये काम करते. वारी ग्रुपने आतापर्यंत 600 हून अधिक मेगावॅट च्या 10 हजारांहून अधिक प्रकल्प यशस्वी करुन दाखले आहेत.
(Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती स्टॉक्स ब्रोकरेजकडील आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.)