मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन असलेली लोकल कोरोनामुळे गेल्या वर्षाभरापासून सर्वसामान्यांसाठी बंद आहे. त्यामुळे मुंबईकर प्रतीक्षेत आहे की, कधी लोकल पुन्हा सामान्यांसाठी धावते. अशात लोकल लवकरचं सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. पण सरसकट सर्वांना लोकलने प्रवास करत येणार नाही, तर टप्प्याने सर्वांसाठी लोकल सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर मुंबईकरांच्या सेवेत लोकल दाखल होण्याची शक्यता आहे. लोकल सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना प्रचंड दिलासा मिळणार आहे.
मुंबई लोकलमधून प्रवासाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना येत्या आठवड्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लोकल प्रवासासाठी तीन टप्पे तयार करण्यात येत असून महिला आणि दिव्यांग प्रवाशांना लवकरच लोकलने प्रवास करण्याची मुभा मिळण्याचे संकेत आहेत. तर सर्वांसाठी पावसाळी अधिवेशनानंतर लोकल सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
तिस-या लाटेचा धोका आणि लोकलमधील गर्दीमुळे कोरोना संसर्ग पसरण्याची भीती वारंवार व्यक्त करण्यात येते आहे. यामुळे अतिशय दक्षतेनं तीन टप्प्यांत लोकल प्रवासाची मुभा देण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्याचं समजतं आहे. पहिल्या टप्प्यात महिला आणि दिव्यांग प्रवासी, दुस-या टप्प्यात 50 वर्षांखालील पुरुष आणि तिस-या टप्प्यात सर्वांसाठी लोकलने प्रवास करण्याची मुभा असे याचे स्वरूप असण्याची शक्यता आहे.
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत चढ उतार कायम आहेत. दिवसभरात राज्यात एकूण 9 हजार 844 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 9 हजार 371 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात एकूण कोरोनामुळे 197 जणांचा मृत्यू झाला आहे.