मुंबई : ड्रग्स केस प्रकरणात कारवाई करणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांच्यावर खंडणी लाचखोरीचेही आरोप करण्यात आले आहेत. वानखेडे यांच्या कठीण प्रसंगी पत्नी त्यांच्या पाठी खंबीरपणे उभी आहे. यावेळी क्रांती रेडकर आणि त्यांचे सासरे ज्ञानदेव वानखेडे हे आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या भेटीसाठी बांद्र्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत.
भेटी दरम्यान काय म्हणाल्या क्रांती रेडकर -
'रामदास आठवले यांना आम्ही सर्व पुरावे दिले आहेत. त्यामुळे ते आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. आज आमच्या पाठी मागे एक नेता उभा राहिला आहे. त्यामुळे नवाब मलिक खोटे आहेत की समीर वानखेडे हे स्पष्ट होईल. नवाब मलिक यांचे सर्व आरोप खोटे आहेत. सर्वांनी सत्याची साथ द्या. अशी मागणी क्रांती यांनी यावेळी केली.
त्या पुढे म्हणाल्या, 'नवाब मलिक यांना कोणाचा नवरा कोण आहे? कोणाची बायको कोण आहे? या बद्दल काय करायचे आहे. नवाब मलिक ड्रग्सबद्दल का बोलत नाहीत? त्यांना खाजगी आयुष्याबद्दल का बोलायचे आहे? असे अनेक प्रश्न क्रांती यांनी यावेळी उपस्थित केले.
काय म्हणाले रामदास आठवले?
समीर वानखेडेयांच्या वरील आरोप खोटे आहेत. नवाब मलिक खोटे आरोप करत आहेत. नवाब मलिक यांचा जावई अटकेत होता त्याचा त्यांना राग आहे. आर्यनकडे काही सापडलं नाही तर एवढे दिवस तुरुंगात कसा होता जामीन का मिळाला नाही ? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
'समीर वानखडे हे बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहेत. नवाब मलिक यांनी आरोप थांबवावे, वानखेडे कुटुंब मुस्लीम नाहीये' असं देखील आठवले म्हणाले. एवढंच नाही तर अभिनेत्री क्रांती रेडकर इकडे आल्यामुळे मला देखील चित्रपटात काम करण्याची इच्छा झाली आहे. असं आठवले म्हणाले.