मुंबईतही ‘एनआरसी’ लागू करा , शिवसेनेची मागणी

मुंबईतील अवैध बांगलादेशींचा प्रश्नही सुटायला हवा.

Updated: Sep 1, 2019, 11:50 AM IST
मुंबईतही ‘एनआरसी’ लागू करा , शिवसेनेची मागणी title=

मुंबई: आसामच्या धर्तीवर मुंबईतही राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. आसाममधील मूळ रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी एनआरसीच्या अंमलबजावणीची आवश्यक होती. बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीचा मुद्दा सर्वप्रथम शिवसेनेकडून मांडण्यात आला होता. मुंबईतील अवैध बांगलादेशींचा प्रश्नही सुटायला हवा. त्यामुळे आसाममधील ‘एनआरसी’ला आम्ही पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता मुंबईमध्येही नोंदणी करण्यात यावी, असे अरविंद सावंत यांनी म्हटले. 

बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्या बेकायदेशीर घुसखोरीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. याच लोकांचा गुन्ह्यांमध्ये हात असल्याने दिल्लीसारखे शहरही धोकादायक झाल्याचेही अरविंद सावंत यांनी सांगितले. यासंदर्भात ते लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपप्रमुख मनोज तिवारी यांची भेट घेणार आहेत.

आसामममध्ये शनिवारी राष्ट्रीय नागरिकत्व प्रमाणपत्राची (एनआरसी) अखेरची यादी जाहीर करण्यात आली. एनआरसीच्या अखेरच्या यादीत ३ कोटी ११ लाख २१ हजार ४ जणांची नावे आहेत. तर १९ लाख ६ हजार ६५७ जणांची नावे या यादीत नाहीत. ज्यांची नावे यादीत नाहीत ते परदेशी लवादाकडे अपील करू शकतात. 

सध्या ज्यांची नावे यादीत नाहीत त्यांच्या सर्व सरकारी सुविधा आणि लाभ रद्द करण्यात आले आहेत. ज्यांची नावे यादीत नाहीत त्यांच्याकडे आधार कार्ड किंवा मतदानपत्र नाही हे सिद्ध झाले आहे.