राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा, पुढील 4 दिवस धोक्याचे

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

Updated: Apr 29, 2022, 11:28 PM IST
राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा, पुढील 4 दिवस धोक्याचे title=

मुंबई : राज्यात उष्णतेची लाट आहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होतेय. राज्यात येत्या 4 दिवसांत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आलाय. चंद्रपुरात पारा तब्बल 46.4 अंशांवर पोहचलाय. त्यामुळे पुढचे चार दिवस राज्यासाठी धोक्याचे असणार आहेत. (warning of severe heat wave in the next 4 days in the maharashtra)

राज्यात जिकडे जावं तिकडे ऊन्हाच्या तीव्र झळांनी अक्षरश: घामाच्या धारा लागतायेत. विदर्भात सूर्य आग ओकतोय. तर मुंबईसह इतरत्र पारा चाळीशीपार गेल्यानं जगणं असह्य झालंय. अशातच पुढचे चार दिवस राज्यात उष्णतेची तीव्र लाट असेल असा इशारा हवामान विभागानं दिलाय. 

राज्यात 4 दिवस उष्णतेची लाट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यासोबतच यंदाचा एप्रिल महिना देशातील उकाड्याचे सर्व विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. भारतातील आतापर्यंतचा सर्वात उष्ण एप्रिल होण्याच्या मार्गावर आहे. हवामान विभागाने विदर्भ, पश्चिम राजस्थान आणि मध्य प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी केलाय.

सूर्य आग ओकतोय

राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपुरात असून इथं पारा 46.4 अंशांवर पोहचला. तर जळगावात 45.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. अकोल्यात 45.4, वर्ध्यात 45.1, यवतमाळमध्ये 45.2, नागपुरात 45.2 तर अमरावतीत 45 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. 

वाढत्या उष्णतोसोबत आजारांना निमंत्रण मिळण्याची भीती आहे. त्यामुळे पुढील चार दिवस महत्वाचं काम असेल तरच लोकांनी घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात येतंय. याशिवाय दैनंदीन कामासाठी घराबाहेर पडणा-यांनी योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. तुमचा निष्काळजीपणा जीवावरही बेतू शकते.