मुंबई : महिलांवर अत्याचार करणा-यांना मुंबईतल्या घाटकोपरमध्ये नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून इशारा देण्यात आला आहे. दिवसेंदिवस महिलांवर बलात्कार, छेडछाडीसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर घाटकोपरच्या एसएनडीटीच्या पी.एन. दोषी वुमेन्स कॉलेजमधील विद्यार्थिनींनी नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून स्त्री संरक्षणाचा संदेश दिला.
कॉलेजच्या वतीने यावेळी गरबा, संगीत आणि स्त्री सुरक्षा या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आलं. आजची स्त्री ही साक्षर असण्यासोबत सक्षमही आहे. तिला त्रास देणा-या आणि अत्याचार करणा-या असुराचे काय होऊ शकते हे पथनाट्याच्या माध्यमातून दाखवण्यात आलं. स्त्रीचा सन्मान करा आणि तिचा सन्मान केला तरच भारत देश ख-या अर्थाने महान होईल असा संदेशही यावेळी देण्यात आला.