Mega Block News 21 April 2024 : पश्चिम रेल्वेवरील ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड वायर्सच्या देखभालीच्या कामांसाठी येत्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेवरील अप आणि डाऊन मार्गावरील सर्व धीम्या मार्गावरील गाड्या बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. तसेच या ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय सेवाही रद्द असणार आहेत. हा ब्लॉक सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 पर्यंत असणार आहे. तर मध्य रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉक असणार नाही.
पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी येत्या रविवारी 21 एप्रिल 2024 रोजी मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर पाच तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. यादरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्व धीम्या मार्गावरील गाड्या बोरिवली ते गोरेगाव यादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय सेवाही रद्द केल्या जाणार आहेत.
यासोबतच अंधेरी आणि बोरिवलीच्या काही गाड्या हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत बोरिवली स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2, 3 आणि 4 वरुन कोणतीही ट्रेन धावणार नाही. या ब्लॉकची सविस्तर माहिती आणि रद्द केलेल्या लोकलची यादी स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात उपलब्ध असेल. पश्चिम रेल्वेच्या या ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामाशी संबंधित पूर्वतयारी OHE (ओव्हरहेड इक्विपमेंट) कामासाठी रविवारी मध्य रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. पण मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथील पायाभूत कामांसाठी दोन दिवसीय रात्रकालीन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवार-शनिवारी आणि शनिवारी-रविवारी मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत (दोन्ही दिवशी प्रत्येकी 4 तास) भायखळा – सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन जलद मार्गावर, वडाळा रोड – सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असेल. या कालावधीत लोकल सेवा उपलब्ध नसतील.
ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल मध्यरात्री 12.14 वाजता सीएसएमटी-कसारा लोकल धावेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल पहाटे 4.47 वाजता सीएसएमटी-कर्जत यादरम्यान असेल. ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल रात्री 10.34 वाजता कल्याण-सीएसएमटी लोकल धावेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल पहाटे 4 वाजता ठाणे-सीएसएमटी लोकल असेल.
ब्लॉक कालावधीत हावडा-सीएसएमटी अतिजलद एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी मेल दादरपर्यंतच धावणार आहेत.