Mumbai Rain: मुंबईमध्ये कधी होणार पावसाचं आगमन? हवामान खात्याने वर्तवला अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत 4-5 जूनपर्यंत मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. तरी मुंबईत 6 ते 13 जूनपर्यंत चांगला पाऊस अपेक्षित आहे. यंदा मुंबईमध्ये पावसाचं आगमन वेळेवर होणार असून त्याचं प्रमाणंही चांगलं असण्याची शक्यता आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jun 2, 2024, 06:52 AM IST
Mumbai Rain: मुंबईमध्ये कधी होणार पावसाचं आगमन? हवामान खात्याने वर्तवला अंदाज title=

Mumbai Rain: राज्यात अनेक ठिकाणी उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेने त्रस्त असलेले नागरिक पावसाची वाट पाहत असून मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हवामान अभ्यासकांनी मुंबईत 4-5 जून रोजी पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पावसाच्या आगमनानंतर उकाड्याचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत 4-5 जूनपर्यंत मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. तरी मुंबईत 6 ते 13 जूनपर्यंत चांगला पाऊस अपेक्षित आहे. यंदा मुंबईमध्ये पावसाचं आगमन वेळेवर होणार असून त्याचं प्रमाणंही चांगलं असण्याची शक्यता आहे. पावसाची प्रगती योग्य गतीने सुरू असून त्यामुळे मुंबईत पाऊस वेळेवर येणार असल्याचा अंदाज आहे. 10 जूनपर्यंत मुंबईच्या कमाल तापमानात सातत्याने घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 10 जून रोजी तापमान 31 अंशांवर पोहोचेल.

हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाणे, रविवार आणि सोमवारी किमान तापमान 28 अंश सेल्सिअसवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. IMD च्या अंदाजानुसार, मंगळवार आणि बुधवारी तापमान 27 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. गुरुवार ते शनिवारपर्यंत किमान तापमान 27 ते 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पुढील आठवड्यात ढगाळ आकाश आणि वातावरणातील धुकं राहण्याचा अंदाज आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

एकीकडे मान्सूनचं आगमन झाल्याचं पाहायला मिळतंय मात्र दुसरीकडे राज्यभरात उष्मतेनं कहर केला. यावेळी अनेक भागामध्ये तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून (Monsoon 2024) केरळमध्ये दाखल झाला आहे आणि तो पुढे हळूहळू ईशान्य भारताच्या बहुतांश भागांत पुढे सरकणार आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांची उकाड्यापासून मुक्तता होऊ शकते.