मुंबईकरांचा मृत्यू एवढा स्वस्त आहे का? विमल गायकवाड यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

Mumbai Rain : मुंबईत कालपासून पावसानं धुमाकूळ घातला आहे. बुधवारी रात्री मुंबईमध्ये जोरदार पाऊस झाला. मात्र याचदरम्यान मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय.. अंधेरीत एका महिलेचा नाल्यात पडून मृत्यू झालाय.. आता या प्रकरणाची मुंबई महापालिकेकडून चौकशी सुरु झालीय.

राजीव कासले | Updated: Sep 26, 2024, 08:52 PM IST
मुंबईकरांचा मृत्यू एवढा स्वस्त आहे का? विमल गायकवाड यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? title=

मनोज कुळकर्णीसह ओम देशमुख झी मीडिया, मुंबई : मुंबईत कालपासून पावसानं धुमाकूळ घातला आहे. बुधवारी रात्री मुंबईमध्ये जोरदार पाऊस (Mumbai Heavy Rain) झाला. मात्र याचदरम्यान मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय.. अंधेरीत एका महिलेचा नाल्यात पडून मृत्यू झालाय.. आता या प्रकरणाची मुंबई महापालिकेकडून (BMC) चौकशी सुरु झालीय. तीन सदस्यीय समितीमध्ये महापालिकेचे उपायुक्त यांच्यासह अग्निशमन अधिकारी आणि शहर अभियंता यांचा समावेश आहे. मात्र या प्रकरणावरुन मुंबईकर चांगलेच संतापले आहेत.

विमल गायकवाड यांचा मृत्यू

बुधवारी मुसळधार पावसाने मुंबईला झोडपलं. सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतूक खोळंबली. अंधेरीत काम करणाऱ्या विमल गायकवाडसुद्धा (Vimal Gaikwad) रात्री कामावरुन घरी जाण्यासाठी निघाल्या. वाटेत धो धो पाऊस बरसत होता. विमल गायकवाड यांचं कुटुंबही त्यांची वाट पाहत होतं. मात्र त्या घरी पोहोचल्याच नाहीत. विमल गायकवाड सिप्झ कंपनीच्या परिसरात पोहोचल्या. भर पावसात रस्ता ओलांडत होत्या. मात्र तिथेच मेट्रोच्या कामासाठी खड्डा खणला होता. त्यावर झाकणही नव्हतं. विमल गायकवाड याच खड्ड्यात कोसळल्या. तिथे त्या शंभर ते दीडशे मीटरपर्यंत वाहून गेल्या.

विमल गायकवाड या घरात एकट्याच कमावणाऱ्या होत्या. विमल गायकवाड यांच्या मृत्यूनंतर या खड्ड्यावर झाकणं का नव्हतं? असा सवाल संतप्त नागरिकांनी विचारलाय. तर ही शांत डोक्याने घडवून आणलेली हत्या असल्याचा आरोप काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केलाय.दुसरीकडे तुंबलेली मुंबई आणि विमल गायकवाड यांच्या मृत्यूप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगलंय..

मृत्यूला जबाबदार कोण?

मेट्रो 3 लाईनचं 5 ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे. मात्र याच मेट्रोच्या कामासाठी केलेल्या खड्ड्यात पडून विमल गायकवाड यांना जीव गमवावा लागला. त्या खड्ड्यावर झाकण असतं तर विमल गायकवाड यांचा जीव वाचला असता. मेट्रो प्रशासनासारखंच मुंबई महापालिका प्रशासनानेही समस्येकडे दुर्लक्ष केलं. प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे विमल गायकवाड आज या जगात नाहीत.

एखाद्या राज्याएवढं मुंबई महापालिकेचं बजेट आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेचं काय? मुंबईकरांचा मृत्यू एवढा स्वस्त का? असा संतप्त सवाल मुंबईकर विचारतायत..