ठाकरे सरकारचे खाते वाटप का रखडतेय, हे आहे कारण?

ठाकरे सरकारचे उद्या खातेवाटप जाहीर होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

Updated: Jan 1, 2020, 10:16 PM IST
ठाकरे सरकारचे खाते वाटप का रखडतेय, हे आहे कारण? title=

मुंबई : राज्यात सध्या खात्यांची गोळाबेरीज सुरु आहे. खातेवाटपाबाबत जोरबैठका सुरु आहेत. आता हे खाते वाटप उद्या संख्याकाळपर्यंत होईल, असे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तिन्ही पक्षांचे सरकार असल्याने प्रत्येकाची मागणी असते. त्यामुळे त्यांनी मागणी करणे काही गैर नाही. मात्र, सर्वांचे एकमत झाले आहे. आता मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्यानुसार ते उद्या खातेवाटप जाहीर करतील, असे अजितदादा म्हणालेत.

राष्ट्रवादीची यादी दिली, उद्या खातेवाटप - पवार

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप उद्यापर्यंत जाहीर होईल. आजच होणार  होते. मात्र, जास्त उशीर झाल्याने ते होऊ शकलेले नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मंत्रालयातील बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र विकासआघाडीची बैठक संपली आहे. कुणाला कुठले खाते द्यायचे हे निश्चित झाले आहे. तसेच अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असेल. राष्ट्रवादीच्या कोणत्या मंत्र्याला कोणती खाती द्यायची याची यादी आमचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिली आहे. सगळे काही निश्चित झाले आहे, उद्यापर्यंत पालकमंत्र्यांसहीत सगळे खातेवाटप होण्याची शक्यता आहे, असे अजित पवारांनी सांगितले

दरम्यान, शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह मिळालीयत १५ मंत्रिपदे, राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपदे वाट्याला आली आहेत. तर काँग्रेसच्या वाट्याला १२ मंत्रिपदं आली आहेत. शिवसेनेने त्यांच्या कोट्यातून तीन अपक्ष आमदारांना राज्यमंत्रिपदं दिली आहेत. त्यातही दोघांना पवारांनी राज्यमंत्रिपदे मिळवून दिली. शंकरराव गडाख हे यशवंतराव गडाख यांचा मुलगा. गडाख सिल्व्हर ओकला भेट देऊन नंतर मातोश्रीला पाठिंबा देण्यासाठी गेले होते. तर शिरोळ मतदारसंघ जागावाटपात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेल्यानं राजेंद्र पाटील यड्रावकर यांना राष्ट्रवादीचं तिकीट देण्यात अडचण होती. पण यड्रावकर अपक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला.

तर बच्चू कडू हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच. धनंजय मुंडेंच्या विधानपरिषदेतल्या जागेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाचे सदस्य होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच शिवसेनेनं राष्ट्रवादीला एक जास्तीची दिल्याची चर्चा आहे.  महाराष्ट्र विकास आघाडीतल्या खाते वाटपाचा तिढा आणखी वाढला आहे. खाते वाटपात शिवसेनेच्या वाट्याला तब्बल २४ खाती आल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये अवस्थता आहे. पहिल्या खातेवाटात शिवसेनेकडे २४, राष्ट्रवादी १३ आणि काँग्रेसकडे ११ खाती गेली आहे. 

शिवसेनेकडे गेलेली जादा खाती मिळवण्याचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रयत्न आहे. खातेवाटपात शिवसेनेकडे मुख्यमंत्री पदासह सगळ्यात जास्त खाती गेल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीकडून यातील खाती मिळवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे खाते वाटपावर पुन्हा चर्चा होणार आहे. या गोंधळामुळे खातेवाटप लांबण्याची चिन्हं आहेत. दरम्यान, मंत्री जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात हे खातेवाटपावरुन नाराजी नसल्याचे सांगत आहेत.

खातेवाटपाचं घोडं काही केल्या पुढे सरकता सरकत नाही. नाराजी नाही, असे कितीही दावे केले असले तरी तीनही पक्षांमध्ये धुसफूस आहेच. मंत्रिपदं आणि खात्यांवरून कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर दबाव असल्याची चर्चा आहे. ग्रामीण भागाशी निगडीत असलेले कृषी खाते हे ज्येष्ठ आणि विश्वासू अशा सुभाष देसाई यांच्याकडं सोपवले जाण्याचे संकेत सामना या वृत्तपत्रातून दिलेत पण काँग्रेसला शिवसेनेच्या ताब्यातलं कृषी किंवा राष्ट्रवादीच्या ताब्यातलं ग्रामविकास खातं हवंय. त्याचसाठी बाळासाहेब थोरातांनी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली. इतर मलईदार खात्यांसाठी शिवसेनेतही रस्सीखेच आहे.

गृह खात्यावरुन राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख आणि दिलीप वळसे पाटील या ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये रस्सीखेच  आहे.नवाब मलिकांना प्रस्तावित उत्पादन शुल्क खातं नकोय, कामगार खात्यावर त्यांचा डोळा आहे. धनंजय मुंडेंच्या रिकाम्या होणाऱ्या विधानपरिषदेच्या जागेमधून उद्धव ठाकरेंचा विधिमंडळात शिरकाव होईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना चांगलं खातं मिळण्यासाठी अजित पवार आग्रही आहेत. अमित देशमुख यांना उर्जा खातं तर आदित्य ठाकरे यांना पर्यावरण, उच्चशिक्षण खातं मिळण्याची शक्यता आहे.
 
हा खातेवाटपाचा तिढा आणखी वाढणार आहे. कारण शिवसेनेकडे गेलेल्या तब्बल २४ खात्यांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे. तीन पक्षांतल्या इच्छुकांचं समाधान करणं, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोरचं मोठं आव्हान आहे. आता खातेवाटपात उद्धव ठाकरे धक्कातंत्र वापरणार का, याची उत्सुकता आहे.