दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात डावलल्यानंतर नाराज असलेल्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक मातोश्री इथे आज पार पडली. या बैठकीतील चर्चेबाबत शिवसेनेने अत्यंत गुप्तता पाळली आहे. मात्र एनडीए अस्तित्व नसल्याचे विधान करणारी शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार का याबाबत या बैठकीनंतर उत्सुकता निर्माण झाली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात आणि राज्य मंत्रिमंडळात सहभागी झाल्यापासून कोणतीच गोष्ट शिवसेनेच्या मनाप्रमाणे झालेली नाही. शिवसेनेला हवी असलेली खाती मिळालीच नाहीत, शिवाय सर्व महत्त्वाच्या निर्णयातही शिवसेनेला डावलण्यात आलं. राज्यात तर मुख्यमंत्री शिवसेनेच्या खात्यातही हस्तक्षेप करू लागले. याशिवाय अनेक कारणांवरून शिवसेना-भाजपामध्ये मागील तीन वर्षांपासून तू-तू मैं मैं सुरू आहेच. त्याला आता आणखी एक निमित्त मिळालं ते रविवारी झालेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं...
या विस्ताराबाबत भाजपाने शिवसेनेकडे विचारणाही केली नाही. त्यातून नाराज झालेल्या उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला, तर दुसरीकडे शिवसेनेने एनडीएच्या अस्तित्वाबाबतच प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांची आणि संपर्क प्रमुखांची महत्त्वपू्र्ण बैठक मातोश्रीवर पार पडली. या बैठकीबाबत शिवसेनेचे नेते बोलायलाही तयार नव्हते. माध्यमांनी थांबवल्यानंतर काही नेत्यांनी या बैठकीत संघटनात्मक बाबी तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं.
केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या वाट्याला दोन मंत्रीपदे आली आहेत, शिवसेनेचा एक मंत्री सध्या मंत्रिमंडळात आहे, तर दुसरे मंत्रीपद रिक्त आहे. विस्तारात हे मंत्रीपद भरण्याची शिवसेनेची इच्छा होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विस्तारातून शिवसेनेला डावलले आहे. यामुळे अस्वस्थ असलेल्या शिवसेनेने तातडीची बैठक घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीवर चर्चा केली असावी यावर विश्वास बसणे अवघड आहे.
बैठकीनंतर स्वतः माध्यमांशी बोलणारे शिवसेना नेते मातोश्रीवरील बैठकीनंतर माध्यमांपासून दूर पळत होते, त्यामुळेच निश्चितच भाजपाबरोबर यापुढे कसे संबंध ठेवायचे यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. कदाचित शिवसेनेला ही भूमिका आताच समोर आणायची नसेल, ही भूमिका समोर आणायला शिवसेना योग्य वेळेची आणि संधीची वाट पाहत असावी. आतापर्यंत केवळ धमकी देणाऱ्या शिवेसनेने टोकाची भूमिका घेतलेली नाही. आता शिवसेना काय करणार याबाबत त्यामुळेच उत्सुकता निर्माण झाली आहे.