अग्निवीरचं प्रशिक्षण घेणाऱ्या मुलीने मुंबईत संपवलं जीवन; नौदलाच्या हॉस्टेलमध्ये घेतला गळफास

मुंबईत अग्निवीर प्रशिक्षणार्थी मुलीने आत्महत्या केली आहे. नेवी हॉस्टेलमध्ये मुलीने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 28, 2023, 12:49 PM IST
अग्निवीरचं प्रशिक्षण घेणाऱ्या मुलीने मुंबईत संपवलं जीवन; नौदलाच्या हॉस्टेलमध्ये घेतला गळफास title=

मुंबईत अग्निवीर प्रशिक्षणार्थी मुलीने आत्महत्या केली आहे. 20 वर्षी तरुणी भारतीय नौदलात अग्निवीरचं प्रशिक्षण घेत होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्टेलमध्ये गळफास घेत तिने आत्महत्या केली. ही तरुणी मूळची केरळची होती. ती मालाडच्या पश्चिम उपनगरातील मालवणी भागातील आयएनएस हमला येथे प्रशिक्षण घेत होती, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी गेल्या 15 दिवसांपासून प्रशिक्षण घेत होती. यावेळी तिला मुलभूत प्रशिक्षण दिलं जात होतं. यादरम्यान मुलीने सोमवारी सकाळी हॉस्टेल रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. 

मुलीने वैयक्तिक कारणांमुळे टोकाचं पाऊल उचललं असं दिसत आहे. कारण घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास केला जात आहे अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. 

अग्निपथ योजना 2022 मध्ये सुरू करण्यात आली आहे. या अग्निपथ योजनेंतर्गत सशस्त्र दलांकडून तरुणांची भरती घेत त्यांना लष्करी प्रशिक्षण दिलं जातं.