मुंबई : वादळाच्या पार्श्वभूमीवर बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानातील कोविड सेंटर येथून कोरोना रुग्णांना हलविण्यात येत आहे. या सर्व रुग्णांना वरळीच्या एनएससीआय आणि गोरेगाव येथील कोविड सेंटरमध्ये शिफ्ट केलं जात आहे. बसच्या माध्यमातून रुग्ण हलवण्याचं काम सुरु आहे.
आतापर्यंत चार बसमधून १०० हून अधिक रुग्णांना बीकेसीच्या एमएमआरडीएमधून वरळी आणि गोरेगाव येथे हलविण्यात आलं आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात येत आहे. बीकेसीच्या कोविड सेंटरमध्ये सध्या एकूण २४२ कोरोना रुग्ण आहेत.
निसर्ग चक्रीवादळ ३ जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवर संपूर्ण सावधानता आणि दक्षता घेण्यात आली आहे. एनडीआरएफ तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. किपनापट्टीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या वादळाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारी आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
निसर्ग चक्रीवादळ ३ जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बीकेसीच्या कोविड सेंटरमधून रुग्णांना हलविण्यात येत आहे.
दरम्यान, सव्वा लाख चौरस फूट क्षेत्रफळावर एमएमआरडीएने पंहे कोविड-१९ केअर सेंटर तयार केले आहे. येथे तीव्र बाधा नसलेल्या (नॉन क्रिटिकल) संक्रमितांवर म्हणजेच सौम्य व मध्यम रोगसूचक रुग्णांवर उपचार केले जातात. कोरोनाबाधित रुग्णांचा विचार करून या केंद्राची संपूर्ण रचना करण्यात आली आहे.
या केंद्राची क्षमता १,०२६ खाटांची आहे. पैकी १८ वॉर्डमध्ये प्रत्येकी २८ खाटा याप्रमाणे ५०४ खाटांसोबत ऑक्सिजन पुरवठ्याचीदेखील सोय आहे. तर ९ वॉर्डमध्ये प्रत्येकी ५८ खाटा अशा ५२२ इतर खाटा आहेत. तसेच १० मोबाईल आयसीयू बेड आहेत. सध्या येथे १३ डॉक्टर, ८ परिचारिका, १४ वॉर्ड बॉय नेमण्यात आले आहेत.