'हेरिटेज हटाव, मरीन ड्राइव्ह बचाव' मोहिमेला जोर

राणीचा हार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरातल्या जुन्या इमारती १९५० साली बांधण्यात आल्यात

Updated: Jan 4, 2019, 01:00 PM IST
'हेरिटेज हटाव, मरीन ड्राइव्ह बचाव' मोहिमेला जोर

दीपक भातुसे, झी मिडिया, मुंबई : दक्षिण मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह या वसाहतीत चेंबूरसारखी आगीची घटना घडली तर अग्निशमन दलाची गाडी मदतीला वेळेत पोहचणं शक्यच नाही. यावर उपाय म्हणून ७० वर्षापूर्वी उभ्या राहिलेल्या मरीन ड्राईव्ह परिसराच्या पुनर्विकासासाठी इथले रहिवासी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडे परवानगी मागत आहेत. मात्र, हेरिटेजचे कारण पुढे करून ही परवानगी नाकारली जातेय. त्यामुळेच मरीन ड्राईव्हच्या हेरिटेजला विरोध वाढू लागलाय. मुंबईकरांच्या अग्निसुरक्षेसाठी 'झी २४ तास'ने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेत 'हेरिटेज हटाव, मरीन ड्राइव्ह बचाव' अशी मागणी करण्यात आलीय. हेरिटेज धोरणामुळे मरीन ड्राईव्हच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग अडलाय असं स्पष्ट मत 'झी २४ तास'च्या रोखठोक कार्यक्रमात व्यक्त करण्यात आलं. दरम्यान, दक्षिण मुंबईतला मरिन ड्राईव्ह पार्किंग आणि हेरिटेजचा प्रश्न सोडवणार आहोत. येत्या १५ दिवसांत हा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन मुंबईतील भाजपा आमदार राज पुरोहित यांनी दिलं. झी २४ तासच्या रोखठोक कार्यक्रमात त्यांनी हे आश्वासन दिलंय.

हेरिटेज धोरणात बदलाची आवश्यकता

राणीचा हार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरातल्या जुन्या इमारती १९५० साली बांधण्यात आल्यात... या इमारती आता ७० वर्ष जुन्या झाल्या आहेत. या इमारतींचे बांधकाम झाले तेव्हा पार्किंगचे धोरण अस्तित्वात नव्हते, तसेच त्यावेळी वाहनांची संख्याही खूपच कमी होती. मात्र आता इथल्या रहिवाशांना पार्किंगची समस्या भेडसावतेय. त्यामुळे नाईलाजाने इथले रहिवाशी रस्त्यावरच आपल्या गाड्या पार्क करतात. याशिवाय या भागात वानखेडे स्टेडियम, महाविद्यालये असल्याने गाड्यांची वर्दळ जास्त असते. या सगळ्या गाड्या मरीन ड्राईव्ह इथल्या रस्त्यांवर दुतर्फा पार्क केल्या जातात. दुर्दैवाने चेंबूरसारखी आगीची घटना घडली तर या ठिकाणी मदतीसाठी अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत पोहचणं अडचणीचं होणार आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवांशांनी व्यक्त केलीय.

हेरिटेज वास्तुंचा पुनर्विकास?

पार्किंगच्या समस्येबरोबरच या इमारतींचे आयुष्यही संपलेले आहे. ७० वर्ष जुन्या असलेल्या या इमारतींच्या पुनर्विकासाची गरज आहे. त्या दृष्टीने इथले रहिवासी प्रयत्नही करत आहेत. मात्र हेरिटेजचे कारण देऊन या इमारतींचा विकास रखडवला जातोय. राज्य सरकार आणि महापालिका मरीन ड्राईव्हच्या पुनर्विकासाबाबत उदासीन आहे. इतर देशात हेरिटेज वास्तुंचा पुनर्विकास होऊ शकतो मग आपल्या देशात का नाही? असा सवाल प्रसिद्ध वास्तुविशारद शशी प्रभू यांनी विचारलाय. 

मरीन ड्राईव्ह इथल्या एखाद्या इमारतीत आगाची घटना घडली तर पार्किंगचे अडथळे पार करत अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळापर्यंत वेळेत पोहचू शकणार नाही, कारण अशा वेळी प्रत्येक मिनिट महत्त्वाचं असतो, असं माजी मुख्य अग्निसुरक्षा अधिकारी प्रताप करगुप्पीकर यांनी बचावदलाची भूमिका मांडलीय. 

महापालिका आणि राज्य प्रशासनाला कुणाचा तरी जीव गेल्याशिवाय जाग येणार नाही का? असा सवाल इथले रहिवासी करत आहेत. रहिवासी स्वतः पुनर्विकासाची मागणी करत असताना महापालिका आणि सरकार कागदी घोडे नाचवत अडथळेच निर्माण करतंय. त्यामुळे चेंबूरसारखी आगची घटना या ठिकाणी घडली आणि दुर्दैवाने काही विपरित झाले तर त्याची जबाबदारी महापालिका आणि राज्य सरकार घेणार का? हा प्रश्न आहे.