घरोघरी मातीच्या चुली...

सहा महिन्यांपूर्वी ‘बच्चन’ कुटुंबियांत एका छोटुकल्या नव्या सदस्यानं प्रवेश केला आणि पूर्ण घरच आनंदात न्हाऊन निघालं. ऐश्वर्या राय-बच्चन आता आईच्या भूमिकेत खूश आहे. त्यामुळे अभिषेककडे तीचं थोडं दुर्लक्ष होतंय.

Updated: May 17, 2012, 05:53 PM IST

www.24taas.com, मुंबई

सहा महिन्यांपूर्वी ‘बच्चन’ कुटुंबियांत एका छोटुकल्या नव्या सदस्यानं प्रवेश केला आणि पूर्ण घरच आनंदात न्हाऊन निघालं. ऐश्वर्या राय-बच्चन आता आईच्या भूमिकेत खूश आहे. त्यामुळे अभिषेककडे तीचं थोडं दुर्लक्ष होतंय. असं असूनही 'अभि' आनंदात आहे. तो थोड्या लाडातच सांगतो की, ‘ऐश्वर्याचं लक्ष वेधण्यासाठी आता मलाही वाट पाहावी लागते.’ म्हणतात ना, घरोघरी मातीच्या चुली...

 

आपली मुलगी आता सहा महिन्यांची झालीय, याबद्दल अभिषेक जाम खूश आहे. ऐश्वर्याबरोबर तोही आता पित्याच्या भूमिकेत शिरलाय. बाळाला सांभाळण्यात तोही आता मदत करतोय. तो म्हणतो, ‘आराध्याला आता मी कितीही वेळ घेऊन फिरू शकतो, खेळू शकतो, एव्हढच काय तर तिचे डायपरही आता मी बदलू शकतो.’ अभिषेकमधला पिता थोडा हळवा होऊन म्हणतो, ‘आराध्या जेव्हा लहान होती, तेव्हा मात्र तिला उचलून घेण्याची परवानगी मला नव्हती. अॅशनं मला तसं बजावलं होतं.’ बाळाला शांत झोप लागावी, यासाठी अभिषेकला काही दिवस बेडरूममध्ये येण्याची परवानगीही मिळाली नव्हती. ‘रात्री भूक लागल्यावर किंवा अंथरूण ओलं केल्यावर आराध्या मध्येच उठायची. मला हे मान्य करावंच लागेल की, माझ्यापेक्षा अॅश या  बदलेल्या रुटीनमध्येही लवकर अॅडजस्ट झाली. बाळ रडायला लागल्यावर ऐश्वर्याबरोबर मीही लगेच उठायचो. पण नंतर मात्र मला कित्येक वेळ झोप यायची नाही. शेवटी ऐश्वर्यानेचं मला दुसऱ्या रुममध्ये झोपायचा सल्ला दिला.’

 

मग काय, जेव्हा जेव्हा दुसऱ्या दिवशी माझं सकाळचं शूट असायचं माझी रवानगी दुसऱ्या बेडरुममध्ये व्हायची. आराध्या आणि ऐश्वर्याच्या नाजूक नात्याबद्दलही मला एक सुक्ष्म असुया अभिषेकला वाटतेय. ‘आता ऐश्वर्याचा बराचसा वेळ बेबीचा मसाज करण्यात, आंघोळ घालण्यात आणि तिचे लाड पुरवण्यात जातो, त्यामुळे आता मलाही ऐश्वर्याचं लक्ष वेधण्यासाठी वाट पाहावी लागते’ अभिषेक म्हणतो. त्यावरचा त्यानं शोधलेला उपाय म्हणजे तोही एका चांगल्या नवऱ्याप्रमाणे आणि पित्याप्रमाणे या दोघींबरोबर सहभागी होतो आणि दोघींचेही लाड पुरवतो.