अनिल कपूरचं "मराठी प्रेम'

अनिल कपूरनेही मराठी सिनेमाची निर्मिती करायला आवडेल असं मत व्यक्त केलंय. मात्र आपली फक्त ही इच्छा व्यक्त करून अनिल थांबला नाही. तर याआधीही मराठी सिनेमाची निर्मिती करण्याचं काम आपण हाती घेतलं होतं असा खुलासा अनिलने यावेळी केला.

Updated: Mar 7, 2012, 09:09 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

विषयाचं वैविध्य आणि आशयाची समृध्दी यामुळे मराठी सिनेमा प्रगल्भ झाला. मराठी सिनेमाच्या सुवर्णकाळात अनेक दर्जेदार सिनेमांची निर्मिती झाली. विषयाच्या वैविध्यतेत तर आज मराठी सिनेमा हिंदी सिनेमालाही मागे टाकतोय.त्यामुळेच अमिताभ बच्चन, आमीर खान, रविना टंडन, राणी मुखर्जी, अक्षय कुमार हे बॉलिवूड स्टार्स मराठीचे गुणगान गाताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी ‘विहीर’ सिनेमाची निर्मिती केली तर अक्षय कुमारनेही मराठी सिनेमाची निर्मिती करायला आवडेल असं मत व्यक्त केलं होतं. तसंच आशुतोष गोवारीकर आणि माधुरी दीक्षित यांनी देखिल मराठी सिनेमा करायला आवडेल असं वेळोवेळी स्पष्ट केलं आहे.

 

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानही मराठीचे धडे घेत आहे. संजय दत्तनेही मराठी सिनेमात काम करायला आवडले असं सांगितलं. तर ‘कशाला उद्याची बात?’ या मराठी सिनेमात अनुपम खेर प्रमुख भूमिका साकारत आहेत. हा त्यांचा पहिलाच मराठी सिनेमा आहे. बॉलिवूड निर्मात्यांमध्ये मराठी सारखे फिल्मस करण्याची हिंमत नाही असं आपलं परखड मत व्यक्त करत एखाद्या मराठी सिनेमामध्ये काम करायला आणि निर्मिती करायला आवडेल असं रितेश देशमुखने सांगितलं. ‘अय्या’ या हिंदी सिनेमात राणी मुखर्जी मराठी मुलीची भूमिका साकारत आहे आणि राणीने आपला मराठी बाणा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’तही दाखवला.

 

मराठीचं गुणगान गाणाऱ्या या टिपिकल बॉलिवूड स्टार्सच्या यादीत आता आणखी एका बॉलिवूड स्टार्सची भर पडत आहे आणि हा बॉलिवूड स्टार आहे अनिल कपूर. अनिल कपूरनेही मराठी सिनेमाची निर्मिती करायला आवडेल असं मत व्यक्त केलंय. मात्र आपली फक्त ही इच्छा व्यक्त करून अनिल थांबला नाही. तर या आधीही मराठी सिनेमाची निर्मिती करण्याचं काम आपण हाती घेतलं होतं असा खुलासा अनिलने यावेळी केला. या मराठी सिनेमाचं नावही अनिलने रजिस्टर केलंय.

 

अनिल कपूरने ‘हमाल दे धमाल’ या मराठी सिनेमात यापूर्वी काम केलं. त्याचीही आठवण यावेळी अनिलला झाली. तसंच लवकरच अनिल कपूरच्या ‘लाडला’ या गाजलेल्या हिंदी सिनेमाचा रिमेक मराठीमध्ये येत आहे. ‘लाडला’च्या मराठी रिमेकमध्ये मुग्धा गोडसे प्रमुख भूमिका साकारतेय. त्यामुळे मुग्धा ही भूमिका चांगली करेल असंही तो सांगायला विसरला नाही.

 

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारा हा बॉलिवूड स्टार मराठीचा विषय निघाला की त्याविषयी नॉनस्टाप बोलतो. एकूणच अनिलने मराठीशी आपली जुळलेली नाळ अजूनही तोडलेली नाही त्यामुळेच तो आजही मराठीमध्ये रॉक करायला सज्ज आहे आणि यालाच म्हणतात ‘झक्कास’!