'शोले'ही आता '३डी'मध्ये

भारतीय सिनेमाच्या इतिहासातील मानाचे पान ठरलेला शोले आता नवा इतिहास रचणार आहे. प्रेक्षकांचा ऑल टाईम फेवरेट असलेला ‘शोले’ आता थ्रीडी रुपात लवकरच प्रदर्शित होतोय.

Updated: Apr 13, 2012, 05:41 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

शोले म्हटलं की आठवते जय वीरूची अजरामर जोडी, बसंतीचा गावरान नखरा आणि गब्बरचा हटके व्हिलन.  भारतीय सिनेमाच्या इतिहासातील मानाचे पान ठरलेला शोले आता नवा इतिहास रचणार आहे. प्रेक्षकांचा ऑल टाईम फेवरेट असलेला ‘शोले’ आता थ्रीडी रुपात लवकरच प्रदर्शित होतोय.पेन इंडियाच्या सीएमडी जयंतीलाल गाडा यांनी हे शिवधनुष्य उचललंय. १९७५ मध्ये शोलेवर २ कोटी खर्च झाले होते तर २२ कोटींची कमाई शोलेनं आजवर केलीय.तर नव्या शोले थ्रीडीचं बजेट आहे तब्बल २५ कोटी.

 

यापूर्वी मुगल-ए-आझम,नया दौर हे ब्लॅक एण्ड व्हाईट सिनेमांना कलर करून पुन्हा प्रदर्शित करण्यात आलं होतं.या प्रयोगालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. १९९७ मध्ये आलेला हॉलिवूडचा रोमॅण्टिक सिनेमा टायटॅनिकदेखील याचवर्षी थ्रीडीमध्ये रिलीज झाला.यालादेखील प्रेक्षकांनी पसंती दिली. हेच पाऊल बॉलिवूडमध्ये शोलेच्या निमित्ताने उचललं जातंय.

 

शोलेचं थ्रीडी रुप प्रेक्षकांना आवडेल असा निर्मात्यांना विश्वास आहे. मुंबईतील माया स्टुडीओ,हॉलिवूडचे काही तंत्रज्ञ आणि पेन इंडिया स्टुडिओ यांनी मिळून शोले थ्रीडी करण्याचा विडा उचललाय. १५ ऑगस्ट १९७५ ला शोले रिलीज झाला होता. यावर्षी १५ ऑगस्ट याच तारखेला शोले थ्रीडीची भेट प्रेक्षकांना मिळणार आहे.