भारतात पेट्रोलवरील कर जास्त असल्याने, देशात पेट्रोल शेजारील देश आणि अमेरिकेपेक्षाही महाग आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे राज्यमंत्री आर.पी.एन.सिंग यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ६६.४२ पैसे इतकी आहे तर अमेरिकेत पेट्रोल प्रति लिटरसाठी ४४.८८ पैसे मोजावे लागतात.
पेट्रोलच्या किंमतीत १६ नोव्हेंबरला प्रति लिटर २.२२ पैसे कपात केल्यानंतर दिल्लीत पेट्रोल ६६.४२ पैसे प्रति लिटर आहे तर पाकिस्तानमध्ये ४८.६४ पैसे प्रति लिटर इतका भाव आहे. श्रीलंकेत प्रति लिटर ६१,३८ पैसे तर बांग्लादेशमध्ये ५२.४२ पैसे आणि नेपाळमध्ये ६५.२६ पैसे इतका भाव आहे. नेपाळमध्ये तेल शुध्दीकरण कारखाना नसल्याने भारतातूनच आयात करावी लागते.
पण युरोपमध्ये मात्र पेट्रोलचे दर भारतापेक्षा अधिक आहेत. इंग्लंडमध्ये प्रति लिटर १०४.६० पैसे मोजावे लागतात.दिल्लीत पेट्रोलच्या प्रति लिटर ६६.४२ रुपयांपैकी केंद्रीय अबकारी कर आणि विक्री करापोटी २६.५९ पैसे सरकार वसुल करतं. अमेरिकेत पेट्रोलला प्रति लिटर ५.३२ कर आकारणी केली जाते तर इंग्लंडमध्ये ६२,४७ पैसे करापोटी वसुल केले जातात.
दिल्लीत पेट्रोलच्या रिटेल किंमतीपैकी ४५ टक्के इतकं करांचे प्रमाण आहे. पेट्रोलची रिफायनरीतील किंमत ३६,८२ पैसे इतकी आहे तर वाहतुकीचा खर्च २.२५ पैसे आहे. केंद्रीय अबकारी कर १४.७८ पैसे प्रति लिटर आणि विक्री करापोटी ११.०७ आकारण्यात येतात.पेट्रोल पम्प डिलरना प्रति लिटर १.५० पैसे कमिशन देण्यात येते. भारतात पेट्रोलच्या किंमतीत एप्रिल २०१० पासून ३९ टक्क्यांची म्हणजेच प्रति लिटर १८.४९ पैशांची वाढ झाली आहे