अण्णा हजारें संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीला हजर राहण्यासाठी दिल्लीत पोहचल्यानंतर महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राजघाटावर गेले. यावेळी अण्णांनी १९ दिवसांनी आपले मौन सोडले.
संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत जनलोकपाल विधेयकाबाबत चर्चा होणार आहे. अण्णांचे सहकारी अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांनीही अण्णांना बैठकीला जाण्याचा आग्रह धरला होता. त्यानुसार अण्णा दिल्लीत गेले. महाराष्ट्रातील राळेगणसिद्धी येथे अण्णांनी मौनव्रत सुरू केले होते.
अण्णांनी राजघाटावर 'वंदे मातरम्' चा नारा देत १९ दिवसांनी आपले मौन सोडले. मौनव्रतामुळे अण्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. मन:शांतीसाठी मौनव्रत सुरू केले होते. यामुळे मला नवी शक्ती मिळाली आहे, असे अण्णांनी मीडियाशी बोलताना सांगितले.