कॅश फॉर वोटचे मास्टर माईंड अहमद पटेल- गडकरी

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीचे सल्लागार अहमद पटेल हे कॅश फॉर वोट स्कॅमचे मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Updated: Nov 18, 2011, 05:06 PM IST

झी २४ तास वेब टीम, भोपाळ

 

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीचे सल्लागार अहमद पटेल हे कॅश फॉर वोट स्कॅमचे मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींनी राजकीय कट रचल्याप्रकरणी राष्ट्राची माफी मागावी असंही गडकरी म्हणाले. विकिलिक्सच्या गौप्यस्फोटानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींनी अणुकराराच्या मुद्दावरुन सरकार वाचवण्यासाठी १९ खासदार विकत घेतल्याचं स्पष्ट झाल्याचंही गडकरी म्हणाले.

 

भोपाळ इथे पक्षाच्या कार्यालयात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिल्ली उच्च न्यायालयाने माजी खासदार फग्गन सिंग कुलस्ते, महाबीर सिंग भगोडा आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सुधींद्र कुलकर्णी यांना जामीन दिला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींनी कॅश फॉर वोट कटाप्रकरणी राष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशी मागणी गडकरींनी केली. भाजपाचे खासदार तसंच कुलकर्णी यांना या प्रकरणात अडकवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपा या तिघांचाही शनिवारी सत्कार करणार असल्याचंही ते म्हणाले.